Coronavirus: हॉस्पिटलकडून मृतदेहांची अदलाबदल; हिंदू मयतावर दफनभूमीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 04:02 PM2021-04-21T16:02:43+5:302021-04-21T16:08:31+5:30

UP: मुरादाबाद येथे हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दोन समुदायातील लोकांमध्ये मृतदेहांची अदलाबदल झाली. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशच्या जनपद मुरादाबाद येथे खासगी हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याचं समोर येत आहे. हे दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या धर्माशी संबंधित आहेत. या हलगर्जीपणामुळे मृताच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गोंधळ घातला. हिंदू नातेवाईकांना मुस्लिमाचं आणि मुस्लीम नातेवाईकांना हिंदू मृतदेह सोपवण्यात आल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनावर लावला आहे.

मुस्लीम नातेवाईकांनी हॉस्पिटलवर भरवसा ठेवत विनातपासणी मृतदेह ताब्यात घेऊन सिव्हिल लाईन येथील दफनभूमीत दफन केला. तर हिंदूंनी परंपरेनुसार अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीला घेऊन गेले. ज्यावेळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ लागले तेव्हा शेवटच्या क्षणी तो मृतदेह आपल्या कुटुंबातील नसल्याचं समजलं.

त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत संतप्त नातेवाईक रुग्णालयात जाब विचारण्यासाठी गेले. मृतकाच्या कुटुंबांनी प्रशासनाला प्रश्न विचारला असता जो मृतदेह सोपवला आहे तो योग्य आहे. त्याचे अंत्यसंस्कार करा असं नातेवाईकांना सांगण्यात आलं.

मात्र मयताच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्यानंतर प्रशासनाने आपली चूक कबूल केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. प्रशासनाने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता मुस्लीम कुटुंबाशी संपर्क साधला. त्यानंतर दफन केलेला मृतदेह बाहेर काढून तो हिंदू कुटुंबीयांना सोपवण्यात आला.

बरेलीच्या सुभाष नगरमध्ये राहणारे रामप्रताप सिंह हार्ट पेशंट होते. १६ एप्रिलला त्यांची तब्येत खालावली तेव्हा त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते संक्रमित असल्याचं आढळलं. त्यानंतर रुग्णालयाकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. १९ एप्रिलला उपचारादरम्यान रामप्रताप सिंह यांचं निधन झाल्याचं रुग्णालयाने नातेवाईकांना कळवले.

नातेवाईकांनी सांगितलं की, मुखाग्नी देताना मृतदेहाचा शेवटच्या क्षणी चेहरा बघितला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अन्य व्यक्तीचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला होता. त्यानंतर रुग्णालयाला आम्ही जाब विचारला तेव्हा त्यांनी चूक कबूल करण्याऐवजी आमच्यावर दमदाटी केली.

त्यानंतर पोलिसांकडे रुग्णालय प्रशासनाची तक्रार करण्यात आली. तपासानंतर रुग्णालयाने हिंदू कुटुंबाला जो मृतदेह सोपवला होता तो रामपूर इथं राहणाऱ्या नासिर या युवकाचा होता. नासिरच्या कुटुंबांना रामप्रताप सिंह यांचा मृतदेह सोपवला होता.

एसडीएम प्रशांत तिवारी म्हणाले की, कॉसमॉस हॉस्पिटलमधील मृतदेहाचा अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दोन्ही कुटुंबांना त्यांचे मृतदेह सोपवण्यात आले. कोविडमुळे मृतदेह बॅगेत भरून दिले जातात. हॉस्पिटलकडून ही चूक झाली. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले.

पोलिसांनी ज्यावेळी नासिरच्या कुटुंबीयांना रुग्णालयाकडून झालेल्या मृतदेह अदलाबदलीची माहिती दिली तेदेखील शॉक झाले. रुग्णालयाकडून मृतदेह आणून आम्ही तो दफन केल्याचं नासिरच्या घरच्यांनी माहिती दिली.

त्यानंतर पोलीस आणि रुग्णालय प्रशासन यांनी नासिरच्या कुटुंबासोबत दफनभूमीत जाऊन रामप्रताप सिंह यांचा मृतदेह बाहेर काढला. नंतर दोन्ही कुटुंबांना त्यांच्या रुग्णांचे मृतदेह सोपवण्यात आले.