बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:02 IST2026-05-18T15:53:57+5:302026-05-18T16:02:06+5:30

RCC Shivraj Motegaonkar: लातूर येथील प्रसिद्ध रेणुकाई करिअर सेंटर'चे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे शोधत सीबीआयचे पथक गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून होते. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने मोटेगावकर यांच्या कार्यालयावर छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर रविवारी दुपारपासून त्यांची कसून चौकशी सुरू होती. अखेर पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर सीबीआयने सोमवारी त्यांना अधिकृतपणे अटक केली.

मोटेगावकर यांच्या मोबाईलमधील चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि डेटा डिलीट करण्यात आला आहे का, याचा शोध आता सीबीआय घेत आहे. एनटीएच्या अंतर्गत अधिकाऱ्यांशी आणि या प्रकरणातील संशयित पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी मोटेगावकरांचे थेट व घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आले. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळवून ती उत्तरांसह काही खास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

आज १०० कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या RCC साम्राज्याचे मालक शिवराज मोटेगावकर यांचा इतिहास अत्यंत संघर्षाचा होता. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावात अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात शिवराज मोटेगावकर यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील शेती करायचे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी लातूरमध्ये आपल्या मोठ्या बहिणीकडे राहून होम ट्युशन घेण्यास सुरुवात केली. या ट्युशनमधून मिळणाऱ्या पैशांवरच त्यांनी स्वतःचे उच्च शिक्षण पूर्ण केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडमधून त्यांनी एम.एस्सी. (केमिस्ट्री) मध्ये सुवर्णपदक पटकावले. याशिवाय SET/NET-JRF, GATE, DRDO आणि BARC सारख्याअत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दावा त्यांच्या संस्थेकडून केला जातो.

उमरगा आणि लातूरमधील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर केमिस्ट्री शिकवता शिकवता त्यांनी २००३ मध्ये 'रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस'ची स्थापना केली. पुढे सर्व विषय एकाच छताखाली ही संकल्पना आणत त्यांनी फिजिक्स आणि बायॉलॉजीच्या शिक्षकांना एकत्र केले आणि 'RCC पॅटर्न' तयार केला.

लातूरमधून सुरू झालेल्या या क्लासचा विस्तार पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला अशा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये झाला. कोरोना काळात त्यांनी आक्रमक डिजिटल जाहिरातबाजी करत हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या जाळ्यात जोडले.

शिवराज मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नीट परीक्षा संपल्यानंतर लगेचच शूट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांशी संवाद साधत असून, आपल्या मॉक टेस्ट सिरीजच्या बाहेरचा एकतरी प्रश्न आला होता का? असा प्रश्न विचारत आहेत.

यावर उत्तर देताना एक विद्यार्थींनीने कॅमेऱ्यासमोर उघडपणे, "सर, तुम्ही जे १०१ प्रश्न दिले होते, हुबेहूब तेच प्रश्न मुख्य परीक्षेत आले होते," असं म्हटलं. यावर मोटेगावकर अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतात, "आरसीसीचे पेपर्स गरजेपेक्षा जास्त आहेत." हा व्हिडिओ आता सीबीआयसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.