स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:32 IST2026-05-18T15:30:14+5:302026-05-18T15:32:26+5:30
Smartphone Affect Human Life : मूलभूत गरजांमध्ये आता मोबाइलही एक बनली आहे. प्रत्येकाकडे मोबाईल असून, त्यामुळे माणसाचं जगणंच बदललं आहे. याचा थेट परिणाम आता जन्मदरावर झाला आहे. नेमके संशोधनातून काय समोर आले आहे?

स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Smartphone Impact on Human Life : जगातील अनेक देश घटत्या जन्मदरामुळे चिंतेत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना हे देश करत आहेत. घटत्या जन्मदरासाठी महागाई, नोकरीमुळे येणारे दडपण, लहान घर आणि बदललेली जीवनशैली अशी कारणे दिली जात होती, पण आता संशोधनातून नवीन बाब समोर आली आहे. याला मुख्य कारण ठरत आहे स्मार्टफोन!
फायनान्शिअल टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, जगातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त देशांमध्ये लोकसंख्या संतुलन राखण्यासाठी जितका जन्मदर आवश्यक आहे, त्यापेक्षाही खाली गेला आहे. म्हणजेच असे की सध्या या देशांमध्ये लोक इतकी मुलेच जन्माला घालत नाहीयेत, जितकी पुढच्या पिढीची जागा घेऊ शकेल.
दक्षिण कोरिया, जपान, चीन, युरोप आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये आधीपासूनच ही समस्या असन, आता लॅटिन अमेरिका, पश्चिम आशिया आणि आशियातील अनेक देशांमध्ये हा ट्रेंड वाढत चालला आहे.
स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि...
संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असे समोर आले की, मागील १०-१५ वर्षांमध्ये जन्मदरात अचानक घट झाली आहे. त्यामागील कारण फक्त आर्थिक नाहीये. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाने लोकांचे आयुष्य जगण्याची पद्धतच बदलून टाकली आहे.
आता लोक पूर्वीसारखे बाहेर भेटत नाहीत. मोबाईलमुळे रिलेशनशिपमध्ये राहणेही अवघड झाले आहे. त्यातच अनेक लोकांचा कल एकटं राहण्याकडे वाढला आहे. याच गोष्टी लग्न आणि मुलं जन्माला घालण्यावर परिणाम करत आहेत.
जिथे इंटरनेटचा वेग जास्त, तिथे जन्मदर मंद
अभ्यासात असे आढळून आले की, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ४जी इंटरनेट आल्यानंतरच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून असे निष्कर्ष समोर आले की, ज्या भागांमध्ये मोबाईल इंटरनेट पोहोचले आहे, तिथे जन्मदर वेगाने कमी होत आहे. स्मार्टफोन आल्यानंतर तरुण लोकांचा जास्त वेळ हा ऑनलाइन राहण्यातच जात आहे आणि समोरासमोर भेटणे कमी झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते डेटिंग, मैत्री आणि नातेसंबंध या मानवी आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी स्क्रीन पुरत्याच मर्यादित होऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावर लोक दुसऱ्यांचे आयुष्य परफेक्ट असल्याचे पाहत आहेत आणि त्यामुळे नात्यांबद्दलच्या अपेक्षा बदलत आहेत. अनेकजण दीर्घकाळ नातेसंबंध ठेवणे टाळत आहेत. एकटं राहणाऱ्या तरुण लोकांची संख्या वाढत चालली आहे.