"माझी उंची जास्त म्हणून हातातून सिनेमे गेले"; गोविंदाच्या हिरोईनचा मोठा खुलासा, म्हणाली- "अभिनेते घाबरायचे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:43 IST2026-05-11T12:35:09+5:302026-05-11T12:43:29+5:30
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीने अलीकडेच चित्रपटसृष्टी आणि कलाकारांच्या मानसिकतेबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. उंची जास्त असल्याने तिला कोणता त्रास सहन करावा लागला हे तिने सांगितलं आहे

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बत्रा हिने अलीकडेच चित्रपटसृष्टी आणि कलाकारांच्या मानसिकतेबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. १९९७ मध्ये 'विरासत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पूजाने सांगितले की, तिच्या उंचीमुळे तिला करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

पूजा म्हणाली, "त्याकाळी अनेक अभिनेत्यांची उंची माझ्यापेक्षा कमी होती. त्यांच्यामध्ये इतका अहंकार होता की, पडद्यावर अभिनेत्री आपल्यापेक्षा उंच दिसू नये, असे त्यांना वाटायचे. हिरोईने आपल्यापेक्षा लहानच दिसावी, असं त्यांचं मत होतं."

पूजाने आपल्या सुरुवातीच्या दिवसांतील एक आठवण सांगितली. ती म्हणाली की, अभिनेत्री संगीता बिजलानी यांनी तिला इशारा दिला होता की, "तुझी उंची खूप जास्त आहे, त्यामुळे चित्रपटांत तुला संधी मिळणे कठीण आहे."

संगीता यांच्या या बोलण्याने पूजा काही काळ निराश झाली होती, पण तिने हार मानली नाही. पूजाच्या मते, ती आणि संगीता बिजलानी यांच्यासारख्या उंच अभिनेत्रींनी सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण यांच्यासारख्या अभिनेत्रींसाठी मार्ग मोकळा केला आहे.

पूजाने एक खास गोष्ट शेअर केली की, क्लोज-अप शॉट्समध्ये हिरोला आपल्यापेक्षा उंच दाखवण्यासाठी तिला अनेकदा कॅमेऱ्यासमोर पाय थोडे दुमडून उभं राहावं लागायचं. अनेक अभिनेते आपण हिच्यापेक्षा उंचीने कमी दिसू म्हणून घाबरायचे.

मात्र, पूजाने सलमान खानचे विशेष कौतुक केले. ती म्हणाली, "सलमान खान हा एकमेव असा अभिनेता होता, ज्याला माझ्या उंचीची कधीच अडचण नव्हती. तो नेहमी म्हणायचा की 'तू हिल्स घाल, मला काहीच प्रॉब्लेम नाही'. त्याला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर पूर्ण विश्वास होता."

पूजा बत्राने १९९३ मध्ये 'मिस इंडिया इंटरनॅशनल' हा किताब जिंकल्यानंतर ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवले होते. तिने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केले. पूजाने गोविंदासोबत काम केलेला 'हसीना मान जाएगी' हा चित्रपट प्रचंड गाजला.

















