"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 21:10 IST2026-05-11T21:10:07+5:302026-05-11T21:10:37+5:30
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या दिवशी जनतेला इंधन आणि संसाधनांचा वापर कमी करण्याचे आवाहन केले.

"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
PM Modi Appeal To Indians: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा येथे सरदारधाम छात्रालयाचे उद्घाटन करताना पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचे आणि सावधगिरीचे आवाहन केले. पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना, भारताने सतर्क राहण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत लोकांनी लहान, पण महत्त्वपूर्ण पावले उचलली पाहिजेत, असे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जर कोरोना महामारी हे या शतकातील सर्वात मोठे संकट होते, तर पश्चिम आशियातील सध्याचे युद्ध हे या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होत असून, यामुळे भारताला आपली परकीय चलन गंगाजळी वाचवणे आणि आत्मनिर्भर होणे अनिवार्य झाले आहे.
पंतप्रधानांचे देशवासीयांना 'पाच' मोठे संकल्प करण्याचे आवाहन
पंतप्रधानांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन बचतीवर जोर दिला. "पेट्रोल-डीजलचा वापर कमीत कमी करा. शक्य असेल तिथे मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे, त्यांनी कार पूलिंग करून इंधन वाचवावे," असे ते म्हणाले.
वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेस
वाहतुकीवरील खर्च आणि इंधनाचा वापर टाळण्यासाठी खाजगी कंपन्यांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम देण्याची विनंती पंतप्रधान मोदींनी केली. तसेच शाळांना काही काळ ऑनलाइन क्लासेस चालवण्याबाबत विचार करण्याचे आवाहनही केले. व्हर्च्युअल मीटिंग्सना प्राधान्य दिल्यास प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचेल, असे त्यांनी नमूद केले.
सोने खरेदी आणि विदेशी उत्पादने टाळा
परकीय चलन बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी पंतप्रधानांनी देशवासीयांना तूर्तास सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. तसेच खाण्याचे तेल आयात करण्यासाठी मोठी रक्कम खर्च होते, त्यामुळे नागरिकांनी खाण्याच्या तेलाचा वापरही कमी करावा, जेणेकरून आरोग्य आणि देश दोघांचाही फायदा होईल.
वोकल फॉर लोकल आणि वेड इन इंडिया
"विदेशी वस्तूंवर अवलंबून राहण्याऐवजी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या, असा संदेश मोदींनी दिला. तसेच वेड इन इंडिया ची संकल्पना मांडत त्यांनी श्रीमंत भारतीयांना परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करण्याऐवजी भारतातच लग्न सोहळे करण्याचे आवाहन केले. तसेच पंतप्रधानांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना विनंती केली की, प्रत्येकाने किमान ५ विदेशी पाहुण्यांना भारत पर्यटनासाठी घेऊन यावे, जेणेकरून देशाच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळेल.
#WATCH | Gujarat: Prime Minister Narendra Modi says, "When a wedding is held here in India, the very soil of our ancestors bestows its blessings upon us. For weddings, too, India offers numerous magnificent venues; we should choose from among them. In Gujarat, I would say this:… pic.twitter.com/XubJkjMIGg
— ANI (@ANI) May 11, 2026
निवडणुकीच्या निकालांचा उल्लेख
भाषणाच्या ओघात त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी येथील निवडणूक निकालांचाही उल्लेख केला.