IPL च्या यंदाच्या हंगामात स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धरमशालाच्या मैदानात पाच बदलासह मैदानात उतरला. पंजाब विरुद्ध माधव तिवारी या मध्य प्रदेशच्या अष्टपैलू खेळाडूला यंदाच्या हंगामात पहिली संधी मिळाली. खरं तर गत हंगामातच त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता. पण या सामन्यात त्याने एकही षटक टाकले नव्हते. पण IPL च्या दुसऱ्या सामन्यात चेंडू हाती मिळताच त्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवली. आक्रमक अंदाजात फलंदाजी करणाऱ्या प्रियांश आर्यच्या रुपात त्याने IPL मधील पहिली विकेट मिळवली. अखेरच्या षटकात तो महागडा ठरला. पण या षटकातही त्याने कूपर कॉलॉनी याला आपल्या जाळ्यात अडकवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण आहे माधव तिवारी?
माधव तिवारी याचा जन्म २८ सप्टेंबर २००३ रोजी मध्य प्रदेशातील मौगंज या छोट्याशा गावात झाला. इतर अनेक युवा क्रिकेटपटूंप्रमाणे त्याला अद्याप मोठ्या स्तरावरील देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव नाही. त्याने आतापर्यंत फक्त एक IPL सामना खेळला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने IPL २०२५ मेगा लिलावात ४० लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले होते. २०२५ च्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर IPL पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केवळ ३ धावा केल्या. विशेष म्हणजे त्याला त्या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
लोकल टी-२० लीगमध्ये सोडली होती खास छाप
माधव तिवारीने २०२५ मध्य प्रदेश टी-२० लीगमध्ये अनिकेत वर्मा याच्यासोबत भोपाल लेपर्ड्स संघाकडून खेळताना खास छाप सोडली होती. या स्पर्धेत माधवने ५ डावांत १८० च्या स्ट्राइक रेटने १०८ धावा केल्या. त्याने एक अर्धशतकही झळकावले. उपांत्य फेरीत रेव्हा जॅग्वार्सविरुद्ध त्याने ३१ चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी करत भोपाल लेपर्ड्सला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अल्प अनुभावासह IPL मधील एन्ट्री ठरली लक्षवेधी
या खेळाडूची IPL मधील एन्ट्री लक्षवेधी ठरण्यामागचे कारण हे की, त्याने अद्याप प्रथम श्रेणी (First-Class) आणि लिस्ट-A क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. तो फक्त मध्य प्रदेशच्या अंडर-१९ आणि अंडर-२३ संघाकडून खेळला आहे. २०२४-२५ हंगामातील CK नायडू ट्रॉफीमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावत आपली छाप सोडली होती.