VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 23:14 IST2026-05-11T23:04:23+5:302026-05-11T23:14:03+5:30
सोलापुरात झालेल्या या भीषण स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
Solapur Blast:सोलापूर शहरातील गजबजलेल्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात सोमवारी दुपारी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. सहारा गन हाऊस या दुकानासमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्सबाहेर ही घटना घडली. एअरगनसाठी लागणारे साहित्य आणि गंधकाचे बॉक्स वाहनात भरत असताना हा भीषण अपघात झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ सिद्धप्पा छत्रे (वय ५३) हे 'सहारा गन हाऊस' मधून गंधकाने भरलेले बॉक्स आणि छऱ्यांच्या गोळ्या घेऊन बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात ठेवत होते. सामानाची ने-आण करत असताना गंधकाने भरलेला एक बॉक्स अचानक त्यांच्या हातातून निसटून जमिनीवर पडला. जमिनीवर आदळताच या बॉक्सचा प्रचंड मोठा स्फोट झाला.
कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर
हा स्फोट इतका भीषण होता की, केदारनाथ छत्रे यांच्या पायांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. त्यांचे दोन्ही पाय या स्फोटात छिन्नविछिन्न झाले असून ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी छत्रे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांना या अपघातात आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.
भीषण स्फोटाने सोलापूरचा मध्यवर्ती भाग हादरला; कर्मचाऱ्याने गमावले पाय#Solapur#Blastpic.twitter.com/mO9pZ9SlzZ
— Lokmat (@lokmat) May 11, 2026
परिसरात दहशतीचे वातावरण; बॉम्ब शोधक पथक दाखल
स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आसपासचा परिसर हादरला. आवाजामुळे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि त्या बॉक्समध्ये नेमके कोणते स्फोटक द्रव्य होते, याचा तपास करण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले.
सीसीटीव्हीमध्ये थरार कैद
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भररस्त्यात झालेल्या या स्फोटामुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आता सहारा गन हाऊसकडे अशा प्रकारचे स्फोटक साहित्य ने-आण करण्याची रीतसर परवानगी होती का, तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले होते का, या दिशेने तपास करत आहेत.