Sachin Vaze : एन्काऊंटर स्पेशालिस्ट, शिवसेना प्रवेश अन् पुन्हा पोलीस सेवेत रुजू; ‘अशी’ आहे सचिन वाझेंची कारकिर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 04:22 PM2021-03-09T16:22:45+5:302021-03-09T17:07:53+5:30

Sachin Vaze Shivsena Connection, Mansukh hiren Death Controversy: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, या गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली, या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर विरोधकांनी शरसंधान साधलं आहे, तर सत्ताधारी ठामपणे सचिन वाझे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली, त्यानंतर या गाडीच्या मालकाचा खाडीत मृतदेह सापडला, त्यानंतर या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे, यातच सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट खूनाचे आरोप लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.(Who is Sachin Vaze? Mansukh Hiren Death Controversy)

सचिन वाझेंना वाचवण्याचा कोण प्रयत्न करतंय? असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला आहे, यामागे सचिन वाझे यांची राजकीय कनेक्शनही असल्याचं समोर आलं आहे. २००२ मधील घाटकोपर स्फोटाप्रकरणी आरोपी ख्वाजा युनूसचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता, यात सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.(BJP Devendra Fadnavis Allegations on Sachin Vaze)

सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले.

सचिन वाझे यांनी शिवसेनेकडून नालासोपारा विधानसभेची जागा लढवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, त्यावेळी शर्मा अंधेरी गन्हे शाखेचे प्रमुख होते. प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला.

सचिन वाझे यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला, त्यात सचिन वाझेंचाही समावेश होता.

पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता.(Sachin Vaze and Shivsena Connection)

२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, सचिन वाझे यांना पुन्हा २०२० मध्ये पोलीस सेवेत रूजू करून घेण्यात आले, अलीकडेच अन्वय नाईक प्रकरणाचा तपास सचिन वाझेंकडे देण्यात आला होता.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली, त्यावेळी मुंबई पोलिसांकडून सचिन वाझे हे नेतृत्व करत होते. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले होते. रिपब्लिक टीव्हीच्या कथित टीआरपी घोटाळ्याची चौकशीही सचिन वाझे करत आहेत.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणातही सचिन वाझे यांच्यावर आरोप लावण्यात येत आहेत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांची हत्या सचिन वाझेंनीच केली आहे असा आरोप लावला आहे. त्यासाठी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या पत्राचा आधार त्यांनी घेतला, तसेच सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यातील संभाषणाचे सीडीआरही उपलब्ध असल्याचं ते म्हणाले.

मात्र सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली, त्याचा राग आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे. अन्वय नाईक प्रकरणी सचिन वाझे प्रकरणाची तपास करतायेत त्यामुळे विरोधकांचे बिंग फुटेल म्हणून सचिन वाझेंवर आरोप करून त्यांना हटवण्याची मागणी केली जात आहे, असं सांगत सत्ताधाऱ्यांनी सचिन वाझेंची पाठराखण केली आहे.