NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 11:19 IST2026-05-19T11:00:25+5:302026-05-19T11:19:51+5:30
NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हे २०१९ पासून एनटीएसोबत विषय तज्ञ म्हणून जोडले होते.

NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. जयपूरमध्ये अटक करण्यात आलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे २०१९ पासून राष्ट्रीय चाचणी संस्थेत पेपर सेटर म्हणून कार्यरत होते. अंतिम परीक्षेचा तयार केलेला पेपर त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यांना NTA मध्ये कोणी आणले आणि ते संस्थेच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होते, याचा सखोल तपास सुरक्षा यंत्रणा सध्या करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांनी 'एनटीए'मध्ये एक विषय तज्ञ म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण, काही दिवसांनी त्याने व्यवस्थेतील त्रुटींचा गैरफायदा घेतला आणि सर्व गोपनीय कागदपत्रांमध्ये पोहोचला.
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
नीट परीक्षेसाठी तयार केलेल्या पाच विशेष संचांपैकी शेवटचे दोन संच कुलकर्णी याच्याकडे उपलब्ध होते. तपास यंत्रणा आता या प्रकरणात त्याच्या भूमिकेची चौकशी करत आहे.
अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा संशय
या खुलाशामुळे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०१९ मध्ये कोणत्या व्यक्तीने किंवा अधिकाऱ्याने कुलकर्णी यांचा एनटीए'च्या परीक्षा पॅनेलमध्ये समावेश करून दिला, यावर तपास यंत्रणा आता लक्ष केंद्रित करत आहेत. पडद्याआड राहून मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोन आणि इतर नोंदी तपासल्या जात आहेत.
पेपरफुटी प्रकरणात त्याची भूमिका काय होती, तो एकटाच होता की एखाद्या नेटवर्कमध्ये सामील होता, याचा तपासही करण्यात येत आहे. तपास यंत्रणेने आतापर्यंत नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात १० आरोपींना अटक केली आहे. पेपरफुटीचे नेटवर्क एनटीएपासून प्रमुख कोचिंग संस्थांपर्यंत पसरले होते, असा दावा सीबीआयने केला आहे.