हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:32 IST2026-05-19T12:31:17+5:302026-05-19T12:32:37+5:30
३३ वर्षीय ट्विशाने सासरच्या जाचाला कंटाळून १२ मे रोजी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवलं. लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांतच ट्विशाने हे धक्कादायक पाऊल उचललं. ट्विशाच्या निधनाची बातमी ऐकताच अभिनेता दीक्षित शेट्टीला धक्का बसला आहे.

हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
अभिनेत्री आणि मॉडेल ट्विशा शर्माच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. ३३ वर्षीय ट्विशाने सासरच्या जाचाला कंटाळून १२ मे रोजी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवलं. लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांतच ट्विशाने हे धक्कादायक पाऊल उचललं. मुळची उत्तर प्रदेशची असलेली ट्विशा लग्नानंतर भोपाळमध्ये सासरच्या कुटुंबासोबत राहत होती. २०२४ मध्ये ट्विशाची तिचा पती समर्थ सिंहशी ऑनलाइन डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. डिसेंबर २०२५ मध्येच त्यांनी लग्न केलं होतं. आत्महत्या केली तेव्हा ट्विशा २ महिन्यांची गरोदर होती. तिच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्यासोबत काम केलेल्या सहकलाकाराला मोठा धक्का बसला आहे.
ट्विशाने काही सिनेमांमध्ये काम केलं होतं. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुग्गुरु मोनागल्लू' या सिनेमात ती दिसली होती. या सिनेमात ट्विशासोबत अभिनेता दीक्षित शेट्टी मुख्य भूमिकेत होता. ट्विशाच्या निधनाची बातमी ऐकताच त्याला धक्का बसला आहे. दीक्षित म्हणाला, "हे खूपच धक्कादायक आहे. ती एक मेहनती मुलगी होती. तिचं काम ती प्रामाणिकपणे करायची. आयुष्य आनंदाने जगण्यावर ट्विशाचा विश्वास होता. पण, हे ऐकून खूप वाईट वाटलं की तिने आत्महत्या केली. तिचं लग्न झालंय हेदेखील मला माहीत नव्हतं. आम्ही फक्त या एकाच सिनेमात एकत्र काम केलं होतं".
"ट्विशाने मला सांगितलं होतं की तिला मास्टर्स करायचं आहे. अभिनयात तिचं मन लागत नव्हतं. तिचा भाऊ भारतीय सैन्यात होता. त्यामुळे अभिनयात करिअर होणार नाही, हे तिने ओळखलं होतं. तिला तिच्या कुटुंबासोबत राहायचं होतं", असंही दीक्षित शेट्टी म्हणाला.
ट्विशा शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अभिनेत्रीची सासू गिरिबाला सिंह स्वत: एक निवृत्त न्यायाधीश आहेत. तर तिचा पती समर्थ सिंह हा वकील आहे. हुंड्यासाठी ट्विशा शर्माचा छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ट्विशाच्या आईवडिलांनीही सासू आणि पतीवर तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे.