Google मध्ये काम करणारेही दुःखी!; कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे तयार केली लेबर युनिअन, 'या'विरोधात करणार संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 06:49 PM2021-01-05T18:49:36+5:302021-01-05T18:54:19+5:30

जगातील प्रसिद्ध IT कंपन्यांपैकी एक असलेली Google ही आपल्या Employee Friendly पॉलिसीसाठी आणि उत्कृष्ट सुविधांसाठी ओळखली जाते. मात्र, येथील कर्मचाऱ्यांवरही गुप्तपणे लेबर यूनियन तयार करण्याची वेळ आली आहे.

ही यूनियन कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी काम करेल. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या कामगार नियामक संस्थेने गूगलवर, कर्मचाऱ्यांसोबत अनप्रोफेशनल वर्तनाचा आरोप केला होता.

Google कर्मचाऱ्यांची यूनियन ही कर्मचाऱ्यांचे पगार, नोकरीतील सुविधा आणि चांगल्या वातावरणासाठी काम करेल.

या यूनियनमध्ये आतापर्यंत 225 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. अमेरिकेतील टेक इंडस्ट्रीमध्ये, अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.

येथील कंपन्या आपल्याकडे यूनियन तयार करण्यास परवानगी देत नाही, असे म्हटले जाते. यामुळे गुगलच्या कर्मचाऱ्यांनी ही यूनियन अत्यंत गुप्तपणे तयार केली आहे.

डिसेंबर महिन्यात या यूनियनच्या लिडर्सची निवड करण्यात आली. तसेच या यूनियनला, 'अल्फाबेट वर्कर्स यूनियन', असे नावही देण्यात आले आहे.

'शोषणाविरोधात लढा देणार' - न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, यूनियनच्या नेत्याने सोमवारी New York Times मध्ये एक लेख लिहून यूनियनसंदर्भात आपले मत मांडले आहे. यूनियनच्या नेत्याने लिहिले आहे, की यूनियनच्या सदस्यांना योग्य वेतन मिळावे, त्यांचे शोषण होऊ नये, त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये. सर्व कर्मचाऱ्यांना न घाबरता काम करता यावे, यासाठी अल्फाबेट वर्कर्स यूनियन काम करेल. असा या संघटनेचा उद्देश आहे.

Google वर केले गंभीर आरोप - काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील कामगार नियामक संस्थेने Google वर आरोप केले आहे, की कंपनी कर्मचाऱ्यांची बेकायदेशीरपणे चौकशी करत आहे. याविरोधात अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या पॉलिसीविरोधात निदर्शनही केले होते, तसेच एक यूनियन तयार करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, यानतंर त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले.

Google ने दिले आरोपांचे उत्तर - या आरोपांना उत्तर देताना Google ने म्हटले आहे, की आपण उचललेली पावले वैध असल्याचा आपल्याला विश्वास आहे. आपण कुठल्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन केलेले नाही.

गूगलच्या पीपल्स ऑपरेशनच्या संचालक कारा स्लवरस्टीन म्हणाल्या, कंपनीने सातत्याने कर्मचाऱ्यांसाठी सहकार्याचे आणि चांगले वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचारी कामगार कायद्यांतर्गत येतात. यापूढेही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत थेट संपर्कात राहू आणि संवादही सुरूच राहील.

Google मध्ये लैंगिक अत्याचार मोठा मुद्दा - खरे तर, Google मध्ये पगार हा मोठा मुद्दा नाही. कारण येथे अत्यंत चांगल्या प्रकारे पगार मिळतो. मात्र, येथे कर्मचाऱ्यांत पॉलिटिक्स आणि वैचारिक मतभेद यांसंदर्भात वाद समोर येत असतात. येथे लैगिक अत्याचार आणि भेदभावाचेही वातावरण राहते.