Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹११,१११; व्हाल लखपती, किती मिळेल रिटर्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 09:15 IST2026-02-21T09:07:43+5:302026-02-21T09:15:24+5:30

तुम्ही सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनेच्या शोधात असाल, तर पोस्टाची ही स्कीम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

तुम्ही सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनेच्या शोधात असाल, तर पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट (आरडी) स्कीम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. पोस्ट ऑफिसची ही आरडी योजना पाच वर्षांच्या कालावधीसाठी असते. या योजनेत दरमहा ११,१११ रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीनंतर किती रक्कम मिळेल, हे समजून घेण्यासाठी सध्याचा व्याजदर आणि कालावधी लक्षात घेणं आवश्यक आहे.

फेब्रुवारी २०२६ च्या आकडेवारीनुसार, या योजनेवर वार्षिक ६.७% व्याजदर दिला जात आहे, जो तिमाही चक्रवाढ पद्धतीने लागू होतो. जानेवारी ते मार्च २०२६ या तिमाहीसाठी हाच दर कायम आहे.

विशेष म्हणजे, या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना कोणताही अतिरिक्त व्याजदर दिला जात नाही. सरकारद्वारे या व्याजदराचा दर तिमाहीला आढावा घेतला जातो, परंतु सध्या तो ६.७% वर स्थिरावलेला आहे.

यामध्ये तुम्हाला किमान ५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. जर तुम्ही दरमहा ११,१११ रुपये या योजनेत गुंतवले, तर ६० महिन्यांच्या (५ वर्षे) कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक ६,६६,६६० रुपये इतकी होईल.

'क्लियरटॅक्स'च्या (Cleartax) गणनेनुसार, ६.७% वार्षिक व्याजदरानुसार तुम्हाला पाच वर्षांनंतर १,२६,२८५.७२ रुपये केवळ व्याज म्हणून मिळतील. म्हणजेच, मुदतपूर्तीनंतर तुमच्या हातामध्ये एकूण ७,९२,९४५.७२ रुपयांचा मोठा निधी जमा झालेला असेल.

पोस्ट ऑफिसच्या या आरडी योजनेत तुम्ही किमान १०० रुपये प्रति महिना (आणि त्यानंतर १० च्या पटीत) गुंतवणुकीस सुरुवात करू शकता. यामध्ये कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

या योजनेचं एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, सलग १२ हप्ते जमा केल्यानंतर तुम्ही जमा रकमेचा काही हिस्सा कर्ज म्हणून घेऊ शकता. मात्र, खातं मुदतीपूर्वी बंद करायचं असल्यास ते ३ वर्षांनंतरच शक्य आहे.

ही योजना पगारदार व्यक्ती, गृहिणी, छोटे गुंतवणूकदार आणि मुलांच्या शिक्षणासाठी किंवा भविष्यातील नियोजनासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक उत्तम साधन आहे. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्यात रस असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन आरडी खातं उघडू शकता.