Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १६ एप्रिल २०२३ ते २२ एप्रिल २०२३: ‘या’ ८ राशींना यश-प्रगती, धनलाभ; सूर्यग्रहण-अक्षय्य तृतीयेला शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 08:58 AM2023-04-17T08:58:01+5:302023-04-17T09:10:39+5:30

Weekly Horoscope: एप्रिल महिन्याचा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

एप्रिल महिन्याचा आगामी आठवडा अनेकार्थाने चांगला मानला जात आहे. या आठवड्यात सन २०२३ मधील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. भारतातून हे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे भारतात वेधादि नियम पाळू नयेत, असे म्हटले जात आहे. सूर्यग्रहण खगोलीय घटना असली, तरी ज्योतिषशास्त्रात याला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. देश-दुनियेसह १२ राशींवर सूर्यग्रहणाचा प्रभाव दिसून येईल, असे म्हटले जात आहे.

या सप्ताहात गुरुपालट आहे. २१ एप्रिल रोजी गुरु मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. या सप्ताहात रविवारी वरुथिनी एकादशी, सोमवारी प्रदोष, बुधवारी दर्श अमावास्या, शनिवारी अक्षय तृतीया श्री परशुराम जयंती, श्री बसवेश्वर जयंती आहे. रविवार, सोमवार, मंगळवार हे तीन पूर्ण दिवस पंचक असून, बुधवारपर्यंत पंचक राहील. चैत्र कृष्ण एकादशी आहे.

ज्योतिषीय घटना आणि अन्य सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगामी आठवडा महत्त्वाचा ठरणार असून, तुमच्यावर कसा प्रभाव असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी आठवडा लाभदायक ठरू शकेल? कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकेल? जाणून घ्या...

मेष: प्रगती होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. जुनी येणी वसूल होतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. मनात आध्यात्मिक विचार राहतील. काहींना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचे योग येतील. हातून दानधर्म होईल. निष्कारण वादात पडू नका. सप्ताहाच्या शेवटी तुम्ही यशस्वीपणे कामे पूर्ण केलेली असतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. चांगल्या बातम्या कळतील. विविध प्रकारचे लाभ होतील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

वृषभ: अतिशय उत्तम ग्रहमान या आठवड्यात राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. नोकरीत कामाचा ताण असला तरी कामाची दखल घेतली जाईल. त्यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात सतर्क राहायला हवे. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल झाल्याने दगदग होईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मिथुन: चैनीवर खर्च कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला सावध पावले उचलली पाहिजेत. चटकन कुणावरही विश्वास ठेवू नका. काही लोक तुमच्या भिडस्तपणाचा गैरफायदा घेतील. जवळचे वाटत असले तरी अशा लोकांना दूर ठेवा. आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. घरात आनंदी वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल. मौजमजा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च होईल. तुमच्या नावलौकिकात भर पडेल. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कर्क: संघर्ष खुबीने टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला काही अडचणी येतील. नोकरीत कामाचा ताण राहील. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. सतत व्यस्त राहाल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. विरोधकांच्या छुप्या कारवाया चालू राहतील. संघर्ष मुत्सद्दीपणाने टाळलेले बरे राहील. घरात किरकोळ कारणावरून वाद वाढवू नका. काही अनपेक्षित पाहुणे येतील. इतरांच्या कामांसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. विविध प्रकारचे लाभ व भेटवस्तू मिळतील. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

सिंह: हा सप्ताह आपल्याला यशदायक ठरेल. नवीन ओळखी होतील. त्यातून चांगली संधी मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कर्तबगारीला वाव मिळेल. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. कामाच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष नको. वाहनाची दुरुस्ती वेळीच करून घ्या. चांगल्या बातम्या कानावर पडतील. नावलौकिक वाढेल. कार्यक्षेत्रात आघाडीवर राहाल. घरात आनंदी वातावरण राहील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कन्या: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला सावध राहा. विरोधकांच्या कारवाया चालू राहतील. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाची माहिती व योजना इतरांना सांगत बसू नका. जीवनसाथीची चांगली साथ तुम्हाला राहील. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. अचाट साहस टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या शेवटी अडचणी दूर होतील. मानसन्मान मिळेल. पर्यटन घडेल. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ: कटू गोड अनुभव येतील. थोडे कटू थोडे गोड अनुभव येतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. मात्र, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घ्या. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. व्यवसायात सतत व्यस्त राहावे लागेल. वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. कागदपत्रे वाचून मगच सही करा. अटी आणि शर्ती समजून घ्या. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. जीवनसाथीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. स्वतः ची काळजी घ्या. अचाट साहस टाळा. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

वृश्चिक: मानसन्मान मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. भागिदारांची चांगली साथ राहील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. काही बदल होऊ शकतात. घरी पाहुणे येतील. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता ऐकून आनंद होईल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. विरोधक कारवाया करतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. भेटवस्तू मिळतील. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

धनु: नवीन संधी मिळेल. जवळचे लोक गोड बोलून तुमची दिशाभूल करू शकतात. भावंडांशी वाद टाळा. व्यवसायात सतत कार्यरत राहाल. जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. कागदपत्रे तपासून पाहा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काही चांगले बदल होतील. घरातील सदस्यांशी संवाद ठेवा. मुलांची काळजी घ्या. त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज घ्या. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. खाण्या पिण्याचे पथ्य पाळा. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

मकर: मुलांची प्रगती होईल. ग्रहमान सामान्य राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे करताना काही मतभिन्नता राहील. व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरु राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घेतली पाहिजे. बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घ्या. घरात काही कारणावरुन वाद होऊ शकतात. नोकरीत बदलीला सामोरे जावे लागेल. मुलांची प्रगती होईल. त्यांचे हट्ट पुरवावे लागतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कुंभ: धनलाभ होईल : धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. त्यात तुमचा फायदा होईल. व्यवसायात कामानिमित्त दगदग होईल. घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. पाहुण्या रावळ्यांचा आदर राहील. आवडत्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल बदल होतील. सुखसोयी वाढवून मिळतील. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मीन: अनावश्यक खर्च टाळा: सप्ताहाच्या सुरुवातीला काही कारणाने दगदग होईल. प्रवासात सतर्क राहा. महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू सांभाळा. अनावश्यक खर्चाला आवर घाला. जीवनसाथी चांगली साथ देईल. विवाहेच्छूंसाठी अनुकूल काळ आहे. चांगले प्रस्ताव येतील. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरून वाद होऊ शकतात. कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घ्या. कुठेही न वाचता सही करण्याची घाई करू नका. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)