"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 00:18 IST2026-05-11T00:17:07+5:302026-05-11T00:18:26+5:30
इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा दिला असून माजी राष्ट्राध्यक्षांना धारेवर धरलं आहे.

"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Donald Trump Warn Iran: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. इराण गेल्या ४७ वर्षांपासून अमेरिकेसोबत खेळ खेळत असून जगाची दिशाभूल करत आहे, पC आता त्यांचे हे वागणे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला ठणकावले आहे. व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत त्यांनी इराणच्या धोरणांवर आणि अमेरिकेच्या माजी अध्यक्षांवर जोरदार टीका केली.
४७ वर्षांपासूनची फसवणूक आता थांबेल
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "इराण गेल्या ४७ वर्षांपासून अमेरिका आणि जगाला फक्त तारखांवर तारखा देऊन खेळवत आहे. त्यांना वाटते की ते आपल्या ग्रेट अगेन देशावर हसू शकतात, पण आता त्यांचे हसणे कायमचे बंद होईल. अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवायांमध्ये इराणचे ७० टक्क्यांहून अधिक सामरिक तळ उद्ध्वस्त झाले आहेत. इराणचे ए, बी आणि सी टीमचे सर्व नेते आता संपले आहेत. ते पराभूत झाले आहेत, पण आमची कारवाई अजून थांबलेली नाही."
ओबामा आणि बायडेन यांच्यावर सडकून टीका
इराणच्या वाढलेल्या ताकदीसाठी ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांना जबाबदार धरले. "जेव्हा बराक हुसेन ओबामा अध्यक्ष झाले, तेव्हा इराणची चांदी झाली. ओबामांनी इस्रायल आणि इतर मित्र राष्ट्रांना बाजूला सारून इराणला मदत केली. विमानाने सुटकेस भरून अब्जावधी डॉलर्स इराणला दिले गेले. वॉशिंग्टन, व्हर्जिनिया आणि मेरीलँडमधील बँका रिकाम्या करून इराणच्या गुंडांना पैसे देण्यात आले," असा खळबळजनक आरोप ट्रम्प यांनी केला. त्यांनी ओबामांना दुबळा अध्यक्ष तर बायडेन यांना स्लीपी जो म्हणत त्यांचा कार्यकाळ अमेरिकेसाठी आपत्तीजनक होता असं म्हटलं.
अण्वस्त्रांबाबत कठोर इशारा
इराणच्या अण्वस्त्रांवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणचे सरकार वेडे आहे आणि त्यांच्या हातात अण्वस्त्रे असणे हे केवळ इस्रायलसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. "आमची स्पेस फोर्स इराणच्या युरेनियम प्रकल्पांवर आणि अण्वस्त्र केंद्रांवर सतत लक्ष ठेवून आहे. त्या भागात जर कोणीही फिरकले, तर आम्हाला लगेच समजेल आणि आम्ही तिथे हल्ला करू. वेळ आल्यावर आम्ही इराणचे सर्व युरेनियम आमच्या ताब्यात घेऊ," असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील या वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.