पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 23:06 IST2026-05-10T23:06:09+5:302026-05-10T23:06:36+5:30

आळेखिंडीत ४ किलोमीटरच्या रांगा; पर्यायी मार्गांवरही वाहनांची कोंडी

Pune Nashik highway jam for second consecutive day Commuters face immense hardship due to wedding season and weekend | पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल

पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल

आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी झालेली वाहतूक कोंडी रविवारीही कायम राहिली. विकेंड आणि लग्नसराईच्या मोठ्या तिथीमुळे रविवारी दुपारपासून महामार्गावर वाहनांच्या अभूतपूर्व रांगा लागल्या आहेत. आळेखिंड परिसरात सात तासांहून अधिक काळ वाहतूक संथ गतीने सुरू असून, प्रवाशांना अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरासाठी दोन ते तीन तास कसरत करावी लागत आहे.

रविवारी दुपारी २ वाजेनंतर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढली. आज लग्नाचे मोठे मुहूर्त असल्याने अनेक वऱ्हाडी मंडळींची वाहने महामार्गावर उतरली, परिणामी आळेखिंडीत वाहतुकीचा खोळंबा झाला. रात्री ८ वाजेपर्यंत महामार्गाच्या दुतर्फा सुमारे ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी अनेक चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब केला. मात्र, वाहनांचा ओघ इतका प्रचंड होता की हे मार्गही जाम झाले. आळेफाटा - पिंपरी पेंढार - म्हसवंडी - बोटा, बोटा - केळेवाडी - कातडवेढे - आणे पर्यायी मार्गावर दुर्दैवाने, या अरुंद पर्यायी रस्त्यांवरही वाहने अडकून पडल्याने वाहनचालकांची मोठी कोंडी झाली आहे. सध्या या मार्गांवरूनही अत्यंत धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे.

गेल्या सात तासांपासून वाहतूक ठप्प असल्याने लहान मुले, वृद्ध आणि महिला प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. "आळेखिंड ओलांडण्यासाठी दोन तास लागत आहेत, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे," अशी भावना संतप्त वाहनचालक व्यक्त करत आहेत. रात्री उशिरापर्यंत स्थानिक स्वयंसेवक रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र वाहनांची संख्या पाहता जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

वाहनचालकांमध्ये वादावादी अन् किरकोळ अपघात

​पुणे-नाशिक महामार्गावर लागलेल्या वाहनांच्या किलोमीटर लांब रांगांमुळे अनेक वाहनचालकांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. तासन् तास एकाच जागी अडकून पडल्याने चालकांमध्ये शाब्दिक चकमक आणि वादाचे प्रकार घडले. काही ठिकाणी वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने किरकोळ अपघात झाले असून, त्यातून चालकांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, या वादांनंतर काही वाहनचालकांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात धाव घेत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी या वादात मध्यस्थी करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : पुणे-नासिक राजमार्ग फिर जाम: शादी और सप्ताहांत से यात्रियों को परेशानी

Web Summary : पुणे-नासिक राजमार्ग पर शादी और सप्ताहांत की भीड़ के कारण लगातार दूसरे दिन भारी जाम लगा। यात्रियों को घंटों देरी का सामना करना पड़ा, खासकर आलेफाटा के पास, वैकल्पिक मार्ग भी जाम रहे। निराश चालकों ने बहस की, और मामूली दुर्घटनाएँ हुईं, जिससे यात्रा योजनाएँ बाधित हुईं।

Web Title : Pune-Nashik Highway Jammed Again: Weddings and Weekend Cause Travel Chaos

Web Summary : Pune-Nashik Highway faced severe traffic jams for the second consecutive day due to weddings and the weekend rush. Travelers endured hours-long delays, especially near Alephata, with alternative routes also congested. Frustrated drivers argued, and minor accidents occurred, disrupting travel plans significantly.