NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून एक महिला ताब्यात; गेल्या ३ वर्षांपासून आरोपीच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 18:28 IST2026-05-13T18:27:32+5:302026-05-13T18:28:26+5:30
पुण्यातील कात्रज परिसरात ही महिला राहत असून तिनेच विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून एक महिला ताब्यात; गेल्या ३ वर्षांपासून आरोपीच्या संपर्कात
पुणे: नीट यूजी परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीची व्याप्ती देशभर पसरली आहे. त्याचे महाराष्ट्र कनेक्शनही पुढे आले असून या प्रकरणात लातूर, पुणे व नाशिकमध्ये खासगी क्लासेस व समुपदेशकांच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. सराव परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न दिल्याचे आता समोर आले आहे. अनेक नामांकित क्लासेसमध्ये नीट परीक्षेचे प्रश्न विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यामध्ये लातूरमधील दोन तर पुण्यातील एका क्लासने नीट परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
नीटचे नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर तपासात पुणे पोलिसांनी आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतले आहे. महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात ही महिला राहत असून तिनेच विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही महिला धनंजय लोखंडेच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत दोघांमध्ये पैशाची देवाण-घेवाण देखील झाल्याचे दिसून आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. मनीषा वाघमारे हिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.
'नीट' पेपरच्या फुटीचे 'नाशिक कनेक्शन' समोर आले आहे. या प्रकरणी संशयित बीएएमएसचा विद्यार्थी शुभम मधुकर खैरनार (२६) यास सीबीआयच्या निर्देशानुसार मंगळवारी सकाळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. फुटलेल्या पेपरची प्रत्येकी तब्बल १५ लाख रुपयांना विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. पेपर फुटीच्या साखळीतील एक कड़ी म्हणून आरोपी असलेला शुभम हा मुळचा नांदगावचा असून काही दिवसांपासून तो शहरातील इंदिरानगर परिसरात वास्तव्यास आहे. भोपाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा तो विद्यार्थी होता.
राज्यातून बाराहून अधिक संशयितांना अटक करण्यात आली. त्यातील शुभम नाशिकमध्ये सुचेतानगरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील महिला डॉक्टरच्या मालकीच्या थ्री बीचएचके फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. राजस्थान सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी मंगळवारी सकाळी ७ वाजता संपर्क साधून शुभमचा तपास करण्याची विनंती केली होती. पोलिसांनी जलद गतीने शुभमचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. शुभमला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक मंगळवारी रात्री ८ वाजता नाशिकमध्ये पोहोचले. शुभमची रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून कसून चौकशी सुरु होती.