पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 22:39 IST2026-05-13T22:38:55+5:302026-05-13T22:39:57+5:30
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीएस) तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
पुणे: हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट येथे असलेल्या उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर जिवंत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये बॉम्बसदृश्य जिवंत वस्तू आढळल्याची माहिती समोर आल्यानंतर रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीएस) तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हॉस्पिटलच्या एका टॉयलेटमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आली. तपासादरम्यान या वस्तूमध्ये टायमर यंत्रणा असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्यावर तब्बल सात तासांचा टायमर सेट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली होती. पोलिसांनी सगळा परिसर तातडीने सील करत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले. रुग्णालय परिसरातील वाहतूकही काही काळासाठी वळविण्यात आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने अत्यंत सावधगिरीने संशयित वस्तू ताब्यात घेतली. ही वस्तू पुढील तपासणीसाठी ग्लायडींग सेंटरच्या मोकळ्या जागेत नेण्यात आली. तेथे विशेष पद्धतीने तिची तपासणी करून निष्क्रिय करण्यात आले.
अनेकांनी घाईघाईने हॉस्पिटल परिसर सोडण्याचा प्रयत्न केला
सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण कारवाई नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडल्याने कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. बीडीएस पथकाने अत्यंत सावधगिरी बाळगत घटनास्थळी तपास सुरू केला. परिसर पूर्णपणे सील करून कोणतीही अनधिकृत हालचाल होऊ दिली नाही. जवळपास सात तासांच्या प्रयत्नांनंतर संशयास्पद वस्तू सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आली आणि पुढील तपासासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. हा संपूर्ण प्रकार हॉस्पिटलच्या आत घडल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. अनेकांनी घाईघाईने हॉस्पिटल परिसर सोडण्याचा प्रयत्न केला. काही रुग्णांना दुसऱ्या विभागात हलवण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये अशी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पुण्याचे पोलिस कमिशनर अमितेश कुमार यांनी घेतला संपूर्ण घटनेचा आढावा
हॉस्पिटल या घटनास्थळी पुण्याचे पोलिस कमिशनर अमितेश कुमार यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहे. घटनेनंतर रुग्णालय परिसरातील नागरिक, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. ही बॉम्ब सदृश्य वस्तू नेमकी कोणी ठेवली आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून हॉस्पिटलमधील कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. यामागे एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा राग, उपचारातील वाद, आर्थिक कारण, धमकी किंवा इतर कोणताही वैयक्तिक हेतू असू शकतो का, याचाही तपास पोलिस करत आहेत. या संपूर्ण घटनेविषयी पोलिसांकडून अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.