संततधार पावसाने गोदावरी, पूर्णा नद्या तुडूंब; दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 02:29 PM2021-07-22T14:29:53+5:302021-07-22T14:37:02+5:30

Rain in Parabhani : चार दिवसाच्या उघडीपीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. हा पाऊस सर्वदूर असल्याने गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पात्रात आवक वाढली आहे. तसेच सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्या व परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी व पूर्णा या नद्या तुडुंब वाहत आहेत.

पूर्णा-ताडकळस रस्त्यावर पिंगळगड नदीला पूर आल्याने हा मार्ग गुरुवार पहाटेपासून बंद झाला आहे.

चार दिवसाच्या उघडीपीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. रविवारपासून कधी जास्त तर कधी सौम्य स्वरूपात संततधार पाऊस सुरूच आहे.

हा पाऊस सर्वदुर असल्याने हिंगोली जिल्ह्यातील औंढा-वसमत येथील तर परभणी जिल्ह्यातील पावसाचे पाणी तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा, थुना, पिंगळगड या नद्यांना आले आहे आहे.

पूर्णा नदीचे पाणी कंठेश्वर येथे गोदावरी नदी पात्रात विसर्जित होत असल्याने सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत.

सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात बुधवारी दुपारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे.

यामुळे प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडून नदीपाञात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.