सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 23:53 IST2026-04-25T23:52:12+5:302026-04-25T23:53:13+5:30
सावंतवाडीतील नुकसानीची केली पाहाणी

सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन
सावंतवाडी : तालुक्यात मोठे नुकसान झाले असून त्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. झालेल नुकसान मोठ असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू. जवळपास ६१ ठिकाणी नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार तसेच चौकटीत बाहेर जावून देखील लोकांना आधार देऊ, आज आमच्या जनतेला आधाराची गरज आहे असे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. ते शनिवारी सावंतवाडीत झालेल्या नुकसानीची पाहाणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वरून सुरू असलेल्या उलट सुलट चर्चाना पूर्णविराम दिला असून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वाहनाना टोल मधून सुट देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सावंतवाडी येथील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री राणे यांच्यासह आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोंसले, अॅड.अनिल निरवडेकर मनिष दळवी लखमसावंत भोंसले श्वेता कोरगावकर आनंद नेवगी आदिनी पाहाणी केली.
यावेळी श्री पंचम खेमराज महाविद्यालय व रामेश्वर प्लाझा येथे वादळी वाऱ्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे याबाबतची माहिती त्यांनी घेतली. नुकसानीची जास्ती जास्त भरपाई मिळण्यासाठी अहवाल देण्याचे निर्देश राणे यांनी यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील इतर विकासकामांचाही आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
महावितरणच्या कामातही सुधारणा होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करण्यात आली असून भूमिगत वीज वाहिन्यांसाठीही प्रयत्न सुरू आहेत. शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आमदार दीपक केसरकर यांनी सुचवलेल्या बदलांची दखल घेण्यात आली असून बांदा व इतर गावे बाधित होणार नाहीत अशा पद्धतीने नवीन मार्ग तयार केला आहे. हा मार्ग रेडी पोर्टला जोडला जाणार असून यामुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे, त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.