स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करायचाय? नवे नियम पाहूनच जा, अन्यथा एक पैसा परत मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:44 IST2026-01-22T14:14:06+5:302026-01-22T14:44:26+5:30

Indian Railway New Rules For Sleeper Vande Bharat Train Ticket 2026: स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या पहिल्या नियमित सेवेची तिकिटे अवघ्या काही तासांतच फुल्ल झाली आहेत. भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन तिकिटांसाठी नवे नियम आणले आहेत. सविस्तर जाणून घ्या...

Indian Railway New Rules For Sleeper Vande Bharat Train Ticket: १७ जानेवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले. हावडा ते कामाख्या या मार्गावर भारतीय रेल्वेची पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन मार्गस्थ झाली. पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्याचे भाग्य अनेकांना लाभले. याबाबतचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Vande Bharat Sleeper Train Ticket Cancellation And Refund Rules 2026: अर कार वंदे भारत ट्रेनच्या प्रचंड यशानंतर स्लीपर वंदे भारत ट्रेनची आखणी भारतीय रेल्वेने केली. चेअर वंदे भारत ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. आता नियमित पद्धतीने स्लीपर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करण्यात येत आहे. भारतीय प्रवाशांमध्ये वंदे भारत ट्रेनची क्रेझ कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sleeper Vande Bharat Train Ticket New Rules 2026: स्लीपर वंदे भारत ट्रेन २२ जानेवारी २०२६ रोजी कामाख्या येथून आणि २३ जानेवारी २०२६ रोजी हावडा येथून नियमित सेवा सुरू करणार आहे. ईशान्य आणि पूर्व भारताला जोडणारी ही नवीन रेल्वे सेवा केवळ प्रवासाचा आनंद वाढवणार असे नाही तर प्रवाशांना जागतिक दर्जाचा रात्रीचा प्रवास अनुभव देणार असल्याचे म्हटले जात आहे.

स्लीपर वंदे भारत ट्रेन (ट्रेन क्रमांक २७५७६) साठी सर्व श्रेणीतील जागा तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी वेळात फुल्ल झाल्या. १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता पीआरएस आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बुकिंग सुरू होताच, प्रवाशांनी काही तासांतच सर्व तिकिटे काढली. तिकिटांची जलद विक्री प्रवाशांमध्ये या नवीन ट्रेनबद्दलचा उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दर्शवते, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

स्लीपर वंदे भारत ट्रेन कामाख्या येथून सायंकाळी ०६ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८ वाजून १५ मिनिटांनी हावडा जंक्शन येथे पोहोचेल. बुधवार वगळता अन्य सर्व दिवस स्लीपर वंदे भारत गुवाहाटी कामाख्या येथून सुटेल. वंदे भारत स्लीपरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये RAC किंवा वेटिंग लिस्ट तिकीट असणार नाही.

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना केवळ 'कन्फर्म' तिकीटच दिले जाईल. म्हणजेच, आता एका बर्थवर दोन प्रवाशांना बसून प्रवास करावा लागणार नाही. प्रवाशांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी रेल्वेने हा मोठा बदल केला आहे.

भारतीय रेल्वेने स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी किमान ४०० किमी अंतराचे भाडे निश्चित केले आहे. या ट्रेनचे तिकीट दर अंतरावर आधारित असून, GST स्वतंत्र असणार आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये ४०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी, थर्ड एसीचे भाडे ₹९६०, सेकंड एसीचे भाडे ₹१२४० आणि फर्स्ट एसीचे भाडे ₹१५२० असेल.

८०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹१९२०, २एसीचे भाडे ₹२४८० आणि १एसीचे भाडे ₹३०४० असेल. १६०० किमीच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹३८४०, २एसीचे भाडे ₹४९६० आणि १एसीचे भाडे ₹६०८० असेल. २००० किमीच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹४८००, २एसीचे भाडे ₹६२०० आणि फर्स्ट एसीचे भाडे ₹७६०० असेल.

२८०० किमी प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹६७२०, २एसीचे भाडे ₹८६८० आणि पहिल्या एसीचे भाडे १०६४० असेल. ३५०० किमी प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹८४००, दुसऱ्या एसीचे भाडे ₹१०८५० आणि पहिल्या एसीचे भाडे ₹१३३०० असेल. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत स्लीपर ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट रद्द करण्याच्या आणि परताव्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

हे नवीन नियम १६ जानेवारी २०२६ पासून लागू होतील. त्या तारखेनंतर केलेल्या सर्व पात्र तिकीट बुकिंगसाठी लागू असतील. हे बदल रेल्वे प्रवासी (तिकीट रद्द करणे आणि परतावा) नियम, २०१५ मध्ये सुधारणा म्हणून लागू केले जातील. वंदे भारत स्लीपर एक्सप्रेससाठी तिकीट रद्द करण्याचे शुल्क किती लागू होईल ते जाणून घेऊया...

नवीन रेल्वे नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ७२ तासांच्या आत तिकीट रद्द केले तर २५ टक्के शुल्क कापले जाईल. तसेच ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ८ ते ७२ तासांच्या दरम्यान तुमचे तिकीट रद्द केले तर ५० टक्के शुल्क कापले जाईल. ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ८ तासांच्या आत तिकीट रद्द केले तर कोणताही परतावा मिळणार नाही. एकंदरीत या प्रीमियम ट्रेनमधून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तिकीट आरक्षित करताना फेरविचार करणे आवश्यक आहे. अन्यथा, मोठा भुर्दंड सोसावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे.

तिकीट वेळेवर रद्द केले नाही किंवा टीडीआर दाखल केला नाही, तर परतावा दिला जाणार नाही. हे नियम इतर मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत अधिक कठोर आहेत. शेवटच्या क्षणी तिकिटे रद्द होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी आणि सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी नवीन नियम आणल्याचे म्हटले जात आहे. वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचे तिकीट वेळेवर रद्द केले नाही किंवा ट्रेन सुटण्याच्या किमान ८ तास आधी ऑनलाइन टीडीआर (तिकीट ठेव पावती) दाखल केली नाही, तर कोणताही परतावा दिला जाणार नाही.

देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये प्राइव्हेट कपल कूपची सुविधा देण्यात आली आहे. तसेच फर्स्ट एसी कोचमध्ये शॉवर सुविधाही देण्यात आली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये प्रगत सुरक्षा प्रणाली, सुधारित सस्पेंशन, एनर्जी एफिशिएंट आणि अधिक एरोडायनामिक डिझाइन आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी ‘कवच’ प्रणाली, बायो-वॅक्यूम टॉयलेट्स, नाईट-लायटिंग, सीसीटीव्ही, ऑटो-डोअर्स सुविधा ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत.

वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देईल, विशेषतः लांब रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन विशेष ठरणारी आहे. एखाद्या विमानासारख्या सेवा या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष टॉयलेट, बेबी केअर एरिया, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, प्रत्येक कोचमध्ये रिडींग लाइट्स, चार्जिंग पॉइंट्स, फोल्डेबल स्नॅक टेबल्स, जीएपआरपी इंटिरिअर पॅनल्स बसवले आहेत.

पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे. वंदे भारत स्लीपर ही एक सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे ज्यामध्ये एकूण १६ कोच आहेत, ज्यामध्ये ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि १ फर्स्ट एसी कोच आहे. थर्ड एसीमध्ये ६११ बर्थ, १८८ सेकंड एसी आणि २४ फर्स्ट एसी बर्थ आहेत.