सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:07 IST2026-04-15T09:59:59+5:302026-04-15T10:07:54+5:30
Vande Bharat Train New Record: वंदे भारत ट्रेनने १ लाख फेऱ्यांमधून कोट्यवधी प्रवाशांना सुलभ, सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव दिल्याचे म्हटले जात आहे.

Vande Bharat Train New Record: भारतीय रेल्वेच्या सर्व सेवांचा विचार करता वंदे भारत ट्रेन सर्वांत लोकप्रिय आणि सर्वांत चांगली कामगिरी करणारी ठरली आहे. चेअर कार वंदे भारत ट्रेनच्या १६४ सेवा चालवल्या जात असून, देशभरातील २७४ जिल्ह्यातून वंदे भारत ट्रेन सेवा देते. तर कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली असून, त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने २०२५-२६ मध्ये अंदाजे ४ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. मागील वर्षाच्या तुलनेत ३४ टक्के वाढ आहे. या वाढीमुळे आतापर्यंत वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या ९.१ कोटी झाली आहे. अंदाजे १ लाख सेवांचा यात समावेश आहे. वंदे भारत एक्सप्रेसने भारतीय रेल्वेची प्रतिमा आधुनिक, वेगवान प्रवासात रूपांतरित केली आहे. या सेमी-हाय स्पीड ट्रेन असून, त्या प्रमुख शहरांना जोडतात. प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव अधिक चांगला करतात.

भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेनचा सेवांचा वेगाने विस्तार केला आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत २७४ जिल्ह्यांमध्ये १६४ वंदे भारत ट्रेन सेवा कार्यरत होत्या. या ट्रेन स्वच्छ, आरामदायक आणि वेळेवर धावत असल्याने प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात या ट्रेनमध्ये सरासरी प्रवासी संख्या १०५ टक्क्यांहून अधिक होती. यावरूनच वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता सिद्ध होते, असे म्हटले जात आहे. तर रेल्वे मंत्रालयाच्या मते या ट्रेन केवळ कमी अंतराचाच नव्हे, तर मध्यम अंतराचा प्रवासही सुलभ करत आहेत. यामुळे रेल्वेच्या प्रवासी महसुलातही वाढ झाली आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सेवेने लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासाला एक नवीन आयाम दिला आहे. पहिल्या तीन महिन्यांत या स्लीपर वंदे भारत ट्रेन १०० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी क्षमता गाठली. १.२१ लाख प्रवाशांची प्रवास केला आहे.

स्लीपर वंदे भारत ट्रेन १६ कोचसह धावते. त्यात एसी फर्स्ट क्लास, टू-टियर आणि थ्री-टियर अशा अशी कोचरचना आहे. याची एकूण क्षमता ८२३ प्रवाशांची आहे. बायो-व्हॅक्यूम शौचालये, वैयक्तिक प्रकाशयोजना, चार्जिंग पॉईंट्स आणि सुधारित बर्थ डिझाइन यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अविस्मरणीय ठरतो, असे सांगितले जाते.

पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी-हावडा मार्गावर सुरू झाली. ९६० किलोमीटरचे अंतर १४ तासांत पार केले. रेल्वे भविष्यात आणखी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे. तसेच मुंबई ते बेंगळूरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे. ही ट्रेन कधी सुरू होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई आणि केएसआर बेंगळुरू दरम्यान नवीन 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे.

एकूणच, वंदे भारत ट्रेन प्रकल्प हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे केवळ प्रवाशांची सोयच वाढली नाही, तर रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळाली आहे. या ट्रेन सेवांनी उच्च गती, सुरक्षितता आणि आरामदायी सेवा यांमुळे पारंपरिक पर्यायांना मागे टाकले आहे.

















