ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:59 IST2026-04-15T10:59:19+5:302026-04-15T10:59:39+5:30

America Iran War: इराण युद्धावरून डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपीय देशांमध्ये मतभेद वाढले असून, अमेरिकेला वगळून वेगळी नाटो संघटना स्थापन करण्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

nato countries to be separate alliance donald trump to sidelined european preparations to isolate america | ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी

ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी

America Iran War: इराण युद्धात ‘नाटो’ संघटनेतील सहकारी देश आणि द. कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या अन्य दोस्त राष्ट्रांनी मदत न केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशांवर अत्यंत तिखट हल्लाबोल केला होता. ‘नाटो’ला ‘कागदी वाघ’ असेही संबोधत, ‘नाटो’ने एकूण कारभारावरून माझ्या मनावर ओरखडा उमटवला असून, तो मी कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा मी त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला, अशी नाराजी बोलून ट्रम्प यांनी बोलून दाखवली होती. तसेच नाटो देशांमधून बाहेर पडण्याचा इशाराही दिला. यातच आता ट्रम्प यांना बाजूला सारून युरोपीय देश वेगळी नाटो संघटना स्थापन करण्याच्या विचारात असल्याचे म्हटले जात आहे. युरोपीयन देशांनी वेगळ्या NATO ची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. 

मध्यपूर्वेतील संघर्ष आणि वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय देश एक मोठे धोरणात्मक पाऊल उचलण्याची तयारी करत आहे. युरोपीय देश एक नवीन सुरक्षा संरचना विकसित करत आहेत, जी अनौपचारिकपणे "युरोपीय नाटो" म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे, या योजनेतून अमेरिकेला हेतुपुरस्सर वगळण्यात येत आहे. ही रणनीती प्रामुख्याने जगातील सर्वांत महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीला सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. जागतिक तेल पुरवठ्याचा एक मोठा भाग यातून जातो, परंतु अलीकडील युद्धे, क्षेपणास्त्र हल्ले आणि सागरी धोक्यांमुळे जहाज वाहतुकीवर गंभीर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. 

ब्रिटन आणि फ्रान्सकडे या नवीन उपक्रमाचे नेतृत्व

युद्ध संपल्यानंतर हा मार्ग सुरक्षित करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. हेच लक्षात घेऊन ब्रिटन आणि फ्रान्स या उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. या नवीन सुरक्षा योजनेवर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या आठवड्यात ४० हून अधिक देशांची एक मोठी बैठक बोलावणार आहेत. या प्रस्तावामुळे जहाजांचे संरक्षण करण्यासाठी, सुरुंग हटवण्यासाठी आणि देखरेख ठेवण्यासाठी एक बहुराष्ट्रीय संरक्षण आघाडी तयार होईल. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रणाली अमेरिकेच्या नेतृत्वाऐवजी युरोपीय नेतृत्वाखाली कार्यरत असेल. हाच बदल या योजनेला विशेष बनवत आहे. 

युरोपीय देशांची आता आत्मनिर्भर सुरक्षा दिशेने वाटचाल

युरोपीय देशांचे हे पाऊल केवळ सुरक्षेपुरते मर्यादित नाही, तर त्यात एक व्यापक राजकीय संदेशही दडलेला आहे. इराण युद्धावरून डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपीय देशांमध्ये मतभेद वाढले आहेत. अनेक युरोपीय देशांनी अमेरिकेच्या लष्करी कारवायांना किंवा नाकेबंदीच्या धोरणांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. याच कारणामुळे युरोप आता 'आत्मनिर्भर सुरक्षे'च्या दिशेने वाटचाल करत आहे. जर्मनीसारखे देश, ज्यांनी पूर्वी स्वतंत्र लष्करी मार्गाला विरोध केला होता, ते आता या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत. 

दरम्यान, माझ्यामुळेच नाटो अस्तित्वात आहे आणि मीच या संघटनेला वाचवले आहे. जर मी अध्यक्ष नसतो, तर नाटो ही संघटना केव्हाच कोसळली असती. मी केवळ नाटोला वाचवले नाही, तर सदस्य देशांना त्यांच्या जीडीपीच्या ५.५ टक्के वाटा संरक्षण क्षेत्रासाठी देण्यास राजी केले. यापूर्वी हा खर्च केवळ २ टक्के होता. माझ्यामुळेच ते ५ टक्के योगदान देत आहेत. आम्ही नाटोवर प्रचंड पैसा खर्च करतो. पण जर भविष्यात अमेरिकेला नाटोची गरज पडली, तर ते देश आमच्यासाठी उभे राहतील का? याबाबत मला शंका आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

 

Web Title : यूरोपीय देश अमेरिका को अलग करते हुए एक अलग नाटो पर विचार कर रहे हैं।

Web Summary : बढ़ते वैश्विक तनाव के बीच, यूरोपीय देश महत्वपूर्ण तेल मार्गों को सुरक्षित करने के लिए अमेरिका को छोड़कर एक नई सुरक्षा संरचना, एक 'यूरोपीय नाटो' की योजना बना रहे हैं। ब्रिटेन और फ्रांस के नेतृत्व में, यह कदम सुरक्षा मामलों में यूरोप की आत्मनिर्भरता के लिए एक संकेत है, जो अमेरिकी नेतृत्व वाली रणनीतियों से अलग है।

Web Title : European nations consider a separate NATO, sidelining the United States.

Web Summary : Amidst rising global tensions, European countries are planning a new security structure, a 'European NATO,' excluding the US, to secure vital oil routes. Led by Britain and France, this move signals Europe's push for self-reliance in security matters, diverging from US-led strategies.