सिडनी : महान फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या निधनाच्या चार वर्षांनंतर त्यांचा मुलगा जॅक्सन वॉर्न याने एक मोठा दावा केला आहे. जॅक्सनच्या मते, त्याच्या वडिलांचा मृत्यू बहुधा कोविडच्या त्या तीन किंवा चार लसींमुळे झाला असावा, ज्या त्यांना काम करण्यासाठी सक्तीने घ्याव्या लागल्या होत्या.
'२ वर्ल्ड्स कोलाईड' पॉडकास्टवर बोलताना जॅक्सनने आपल्या वडिलांच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या आधीपासून असल्याची कबुलीही दिली. २०२२ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्न यांचे निधन झाले होते. जॅक्सन म्हणाला, 'मला खात्री आहे की यात कोविड लसीचा मोठा वाटा होता. आता हे बोलल्याने कोणताही वाद निर्माण होईल, असे मला वाटत नाही. जरी वडिलांना आधीपासून काही आरोग्यविषयक समस्या होत्या, तरी मला वाटते की लस घेतल्यामुळे त्यांचा आजार बळावला आणि उघडपणे समोर आला.'
वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावरची पहिली प्रतिक्रिया सांगताना जॅक्सन म्हणाला, 'जसा मी फोन ठेवला, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया हीच होती की मी थेट सरकारला दोषी धरले. मी तत्काळ कोविड आणि लसींना जबाबदार धरले.' वॉर्न यांच्या अधिकृत शोकसभेत आपले हे विचार उघडपणे व्यक्त करण्यापासून त्याने स्वतःला रोखले होते. तो म्हणाला, 'कदाचित मी तसे न करणे हे शहाणपणाचे पाऊल होते.'
लस घेण्याची अजिबात इच्छा नव्हती
लस घेण्याच्या सक्तीबाबत बोलताना जॅक्सनने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, 'याआधीही हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोकांचा मृत्यू होत होता; पण वडील पूर्णपणे ठीक होते. मला वाटते की त्यांनी तीन किंवा चार लसी घेतल्या असतील. त्यांना लस घेण्याची अजिबात इच्छा नव्हती; पण इतर लोकांप्रमाणेच काम सुरू ठेवण्यासाठी त्यांना त्या सक्तीने घ्याव्या लागल्या. मी याबद्दल जास्त विचार करू इच्छित नाही, कारण यामुळे फक्त राग वाढतो आणि राग कोणासाठीही चांगला नसतो.'