"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:05 IST2026-04-15T13:04:43+5:302026-04-15T13:05:36+5:30
Nesco Drugs Case: मुंबईतील ड्रग्स केसमध्ये दोन तरुणांचा मृत्यू

"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
Nesco Drugs Case: गोरेगावच्या नेस्को सेंटरमधल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई आणि कल्याण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य ड्रग्ज पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहेत. या मुद्द्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत रोखठोक भूमिका मांडली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "महाराष्ट्राला ड्रगमुक्त करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. १० वर्षांपूर्वी जे प्रमाण पंजाबमध्ये होते, आता तशीच स्थिती महाराष्ट्रात निर्माण होताना दिसतेय. अकोला, अमरावती ते नागपूरच्या ग्रामीण भागापर्यंत ड्रग्जचं जाळं पसरलं आहे. केवळ मुंबई-पुणेच नाही, तर आता नाशिक, संभाजीनगर आणि विदर्भातील ग्रामीण भागातही अंमली पदार्थांच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. 'नेस्को सेंटर'मधील ताज्या प्रकरणामुळे राज्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात कशी अडकतेय, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय."

"सन २०२४ मध्ये ४,२४९ कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तर २०२५ पासून आतापर्यंत १५,९३३ आरोपींना अटक झाली आहे. २०२६ मध्ये केवळ काही महिन्यांतच १,४३८ गुन्हे नोंदवले गेले असून १,६३७ आरोपींना अटक करण्यात आली आणि ९४० कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. अजून वर्षाचे अर्धेही पूर्ण झालेले नाही, तरी ही आकडेवारी परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्टपणे दाखवते. अंमली पदार्थ तस्करीत मदत करणाऱ्या १७ पोलिसांना बडतर्फ करावे लागणे, हे राज्याच्या गृहविभागाचे मोठे अपयश आहे. जेव्हा खाकी वर्दीच तस्करांना साथ देते, तेव्हा नेस्को सेंटरसारखी प्रकरणे गल्लोगल्ली घडणारच. केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही, या 'ड्रग माफिया'च्या पाठीशी असलेल्या राजकीय शक्तींना कधी शोधणार? महाराष्ट्र ड्रगमुक्त करण्याची गरज आहे नाहीतर तरुणाई उध्वस्त होईल महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल!" असा सूचक इशारा वडेट्टीवार यांनी दिला.