“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:22 IST2026-04-15T13:18:22+5:302026-04-15T13:22:25+5:30
Sanjay Raut News: आदित्य ठाकरे यांच्यात पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी आहे, असे वाटत नाही. उद्धव ठाकरे यांनी निवृत्त व्हावे आणि घरी बसावे, असे संकेत यातून मिळत आहेत, असा दावा करण्यात आला.

“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांना मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना इतिहास काढला आहे.
आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष नेमणार आहेत, ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. असाच प्रकार बाळासाहेब ठाकरे हयात असताना उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी निवृत्त व्हावे, असे संकेत या कार्याध्यक्ष पदाच्या निवडीतून मिळत आहेत. तुम्ही बसा, मी धुरा सांभाळतो, असे हे चित्र आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न असला, तरी त्यांच्या पक्षात अनेक ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, आता तिथे कोणाचेही चालत नाही; एक कलमी कार्यक्रम होताना दिसत आहे, असे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांच्यात पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी आहे, असे वाटत नाही
मी ४० वर्षांपासून त्या पक्षाला पाहतो आहे. एखादा निर्णय घेताना सर्वांची सहमती घेतली पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाही. आदित्य ठाकरे यांच्यात पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी आहे, असे मला वाटत नाही. या निवडीमुळे पक्षाचे अस्तित्व संपण्याच्या दिशेने तो पक्ष चालला आहे. शिवसेनाप्रमुखांनी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या कार्याध्यक्ष पदाच्या निवडीचा निर्णय घेतला होता, तेव्हा 'न विचारता प्रस्ताव मांडलाच कसा', असे विचारत नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव मांडला होता. आता पुन्हा हा इतिहास घडण्याच्या मार्गावर आहे. या निर्णयामुळे पक्षाचे भवितव्य चांगले दिसत नाही, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.
दरम्यान, संजय राऊत काय करणार आहेत? कोणाशी भांडणार आहेत आणि कोणाशी बोलणार आहेत? हा पक्ष आता प्रायव्हेट लिमिटेड झाला आहे. तिथे इतरांना अधिकार नाहीत. त्यामुळे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे भांडण आहे, असा निरोप आला, तर त्या भांडणाला पुष्टी मिळेल. पक्षातील सर्वांना विचारले तर कोणीही याला मान्यता द्यायला तयार नाही; मात्र राजासमोर बोलणार कोण, असा प्रश्न आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.