"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:56 IST2026-04-15T14:54:59+5:302026-04-15T14:56:34+5:30
Aaditya Thackeray in Shiv Sena UBT: आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
Aaditya Thackeray in Shiv Sena UBT: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध गोष्टींची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, उद्धवसेनेसंदर्भात एक बातमी आली आहे. जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खासदार संजय राऊत यांनीही याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर दिल्याने ही चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. पण आता या विषयावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.
आदित्य ठाकरे हे उद्धवसेनेचे वरच्या फळीतील नेते आहेत. उद्धव ठाकरे यांचा आमदार म्हणून विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच संपला. आता पुन्हा उद्धव ठाकरे आमदारकी लढवणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण याच दरम्यान महाराष्ट्रात राजकारणात उद्धवसेनेत नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्षपद दिले जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. पण आदित्य ठाकरे यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. "आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी," अशी एक्स पोस्ट करत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 15, 2026
ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही.
🚨 कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी! 🚨
संजय राऊत आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले?
"(आदित्य ठाकरेंबाबत) मला मीडियातून ही माहिती समजली. हे जे निर्णय असतात, ते पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. उद्धव ठाकरे कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आले असेल तर स्वागत केले पाहिजे. मीडियातील माहितीवर हे बोलत आहे. अजून तरी असे काही ठरलेले नाही. तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुढचे राजकारण तरुणाच्या हातात गेले पाहिजे. खासगीमध्ये बोलण्याला अर्थ नसतो. पक्षाच्या संघटनेत चर्चा होत असते. मुंबई महापालिका किंवा इतर महापालिकांच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या तरुणांच्या टीमने उत्तम काम केले आहे," असे संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.
दरम्यान, ठाकरे गटाची महत्त्वाची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल आणि तो मंजूर केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच निष्ठावंत युवा कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळू शकते. संघटनेत फेरबदल केले जाऊ शकतात. संघटना अधिक बळकट करण्यासाठी बूथ स्तरावर आणि जिल्हा स्तरावर काही मोठे फेरबदल होतील, असेही म्हटले जात आहे.