क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:16 IST2026-04-17T13:14:47+5:302026-04-17T13:16:43+5:30

आंध्र प्रदेशातील पालनाडूमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा पाय कुऱ्हाडीने कापला. आरोपी स्वतः कापलेला पाय घेऊन पोलिसांत हजर झाला.

The height of cruelty! The husband chopped off his wife's leg with an axe, then took the same leg to the police station. | क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला

AI Generated Image

आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यात संशयापोटी एका पतीने आपल्याच पत्नीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुप्पल्ला मंडळातील थोंडापी गावात राहणाऱ्या वल्लेपु लक्ष्मैया याने आपली ३३ वर्षीय पत्नी भुलक्ष्मी हिच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. पतीने रागाच्या भरात पत्नीचा उजवा पाय कुऱ्हाडीने तोडून टाकला आणि त्यानंतर जे केले ते पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.

नेमकं प्रकरण काय?

आरोपी वल्लेपु लक्ष्मैया हा मोलमजुरी करतो. त्याचे पत्नीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. लक्ष्मैयाला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून गुरुवारी सकाळी दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या लक्ष्मैयाने घरात असलेली कुऱ्हाड उचलून पत्नीवर वार केले. त्याने थेट कुऱ्हाडीने वार करून तिचा उजवा पाय शरीरापासून वेगळा केला. "आता तुझ्या प्रियकराला भेटूनच दाखव," असे ओरडत त्याने हे पाऊल उचलले.

तुटलेला पाय घेऊन पोलीस ठाण्यात एन्ट्री!

पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना, आरोपी लक्ष्मैयाने तिचा तुटलेला पाय उचलला आणि तो थेट मुप्पल्ला पोलीस ठाण्यात घेऊन गेला. पोलीस ठाण्यात रक्ताने माखलेला पाय घेऊन आलेल्या व्यक्तीला पाहून पोलीस कर्मचारीही चक्रावून गेले. त्याने पोलिसांना सांगितले की, "मी पत्नीचा पाय कापला आहे, मला अटक करा." पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले आणि तो पाय सुरक्षितरीत्या रुग्णालयात पाठवला, जेणेकरून शस्त्रक्रियेद्वारे तो पुन्हा जोडता येईल का, याची तपासणी करता येईल.

पत्नीची प्रकृती चिंताजनक

दुसरीकडे, गंभीर जखमी झालेल्या भुलक्ष्मीला ग्रामस्थांनी तातडीने गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे तिची प्रकृती खालावली असून तिला एनआरआय मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुढील ४८ तास तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर हत्येचा प्रयत्न आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : खौफनाक: पति ने पत्नी का पैर काटा, पैर लेकर पुलिस के पास पहुंचा!

Web Summary : आंध्र प्रदेश में एक व्यक्ति ने अवैध संबंध के शक में पत्नी का पैर कुल्हाड़ी से काट दिया। फिर कटा हुआ पैर लेकर थाने पहुंचा और अपराध कबूल किया। पत्नी गंभीर रूप से घायल है।

Web Title : Horror: Husband chops off wife's foot, carries it to police!

Web Summary : Andhra Pradesh man, suspecting infidelity, severed his wife's foot with an axe. He then walked into the police station with the severed foot, confessing the crime. The wife is critically injured.