धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:11 IST2026-04-17T14:09:44+5:302026-04-17T14:11:30+5:30
चोकाक येथील पुलाखाली खून

धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
हातकणंगले : चोकाक (ता. हातकणंगले) येथील कोल्हापूर-सांगली राज्य मार्गाच्या पुलाखाली गुरुवारी सायंकाळी ७ वाजता मोबाईल खरेदीच्या पैशावरून सचिन ऊर्फ लालू सर्जेराव मुसळे (वय ३४, रा. अतिग्रे ता. हातकणंगले) या तरुणाचा त्याचा मित्र तुषार ऊर्फ पप्पू रवींद्र लोहार (३५ रा. चोकाक) या संशयिताने दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून खून केला. रात्री उशिरा हातकणंगले पोलिस ठाण्यात या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सचिन मुसळे हा एमआयडीसीमध्ये ठेकेदार म्हणून काम करीत होता. तुषार ऊर्फ पप्पू लोहार याच्याबरोबर सचिनची मैत्री होती. गेल्या दोन दिवसांपासून दोघांमध्ये मोबाईलच्या पैशावरुन वाद सुरू होता.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजता दोघे चोकाक येथील रस्त्याच्या पुलाखाली दारू पित बसले होते. यावेळी दोघात पैशावरुन वाद झाला. दारुच्या नशेत तुषार लोहारने सचिन मुसळेच्या डोक्यात दगड घातला. घाव वर्मी लागल्याने तो बेशुद्ध पडला.
पुलाचे काम सुरू असल्याने येथील कामगारांनी पोलीस ठाण्यात घडल्या प्रकराची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर जखमी सचिन मुसळेला सी.पी.आर. रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले. डोक्यात गंभीर दुखापत होत रक्तस्त्राव झाल्याने दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. संशयित आरोपी तुषार लोहारच्या शोधासाठी हातकणंगले पोलिसाची टिम रवाना झाली आहे.
मृत सचिनच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख आप्पासाहेब जाधव, जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. या खुनाचा गुन्हा रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.