Hardik Pandya Rohit Sharma Mumbai Indians Captaincy IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामात सलामीचा सामना जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. पण त्यानंतर पुढील चार सामन्यात मुंबईचा पराभव झाला. पंजाबविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाची फिल्डिंग अतिशय खराब झाली. मोक्याच्या क्षणी तीन महत्त्वाचे झेल सोडण्यात आले. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना १९६ धावांचा बचाव करता आला नाही. मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीनंतर अनेकविध चर्चा सुरू झाल्या आहेत. याचदरम्यान हार्दिक पांड्याबाबत भारतीय माजी क्रिकेटपटूने विधान केले आहे.
"हार्दिक पांड्याच्या म्हणण्याचा असा अर्थ दिसतोय की तो काही प्रस्थापित भारतीय खेळाडूंना संघाबाहेर काढण्याबद्दल बोलताना दिसतोय. तो खेळाडू सूर्यकुमार यादव असू शकतो किंवा तिलक वर्मा असू शकतो. कारण हे दोघे धावा करण्यात अपयशी ठरत आहेत. हार्दिक नक्की कुणाबद्दल बोलत होता हे नक्की सांगता येणार नाही. पण तो बोलताना ज्या पद्धतीने उभा होता, ती देहबोली काही गोष्टी सांगत होती. हार्दिक सध्या सर्वोत्तम स्थितीत नाही असे त्याच्या देहबोलीतून दिसत आहे. संघाचे मालकही मैदानावर दिसले, ते देखील रागात होते. या साऱ्या गोष्टी पाहून एक सांगता येईल की, संघात सारंकाही आलबेल नाही," असे मनोज तिवारी म्हणाला.
"मुंबईच्या संघातील खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरी सुधारणे गरजेचे आहे. तुम्ही इतक्या वर्ष कसे खेळत होतात त्याकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही गेल्या काही वर्षात जिंकत आला आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तेव्हा चुका करत नव्हतात. तुम्ही आताच्या वाईट कामगिरीचे मूळ कारण शोधायला हवे. २०१५ ते २०२३ रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला ट्रॉफी जिंकून दिल्या. आता जर मुंबईला पुन्हा पूर्वपदावर यायचे असेल तर हार्दिक पांड्याने ब्रेक घ्यावा आणि रोहित शर्माने पुन्हा कर्णधार व्हावे. रोहितला कर्णधारपदावरून काढणे हा अन्याय होता. हार्दिक पांड्याकडून ट्रॉफीची अपेक्षा होती, पण त्याला ते जमेल असं वाटत नाही," असे रोखठोक मत त्याने व्यक्त केले.