“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:17 IST2026-04-15T14:17:30+5:302026-04-15T14:17:55+5:30
Ayodhya Ram Mandir: ही यात्रा त्यांच्यासाठी केवळ एक धार्मिक अनुभव नसून एक अविस्मरणीय ठरली.

“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Ayodhya Ram Mandir: काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अयोध्येत जाऊन रामललांचे दर्शन कधी घेणार, या प्रश्नांचे उत्तर अनुत्तरित असतानाच कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदारांनी अयोध्येत जाऊन रामललांचे दर्शन घेतले. आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया या आमदारांनी दिली.
कर्नाटक काँग्रेसचे आमदार टी. बी. जयचंद्र हे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येत आले होते. त्यांनी या भेटीला आपल्या आयुष्यातील एक अत्यंत विशेष आणि महत्त्वपूर्ण अनुभव म्हटले आहे. ही आपली पहिलीच अयोध्या भेट असल्याने हा आपल्यासाठी अभिमान आणि आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या पवित्र स्थळाला भेट देण्याची त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती. कर्नाटकातील इतर अनेक आमदारही या यात्रेत त्यांच्यासोबत सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले. सुमारे १३ ते १४ आमदार प्रभू रामाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.
एक सुंदर आणि विशेष कलाकृती
श्रीराम जन्मभूमी येथे स्थापित केलेली भव्य मूर्ती ही खरोखरच एक सुंदर आणि विशेष कलाकृती आहे. कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगिराज यांना ही मूर्ती साकारल्याचा अभिमान आहे. अयोध्येला भेट देणे हा त्यांच्यासाठी एक भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे, कारण ही त्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. दर्शनानंतर सर्व आमदार दिल्लीला परत येऊन संसदेच्या अधिवेशनात सहभागी होणार आहोत. ही यात्रा त्यांच्यासाठी केवळ एक धार्मिक अनुभव नसून एक अविस्मरणीय अनुभव ठरली आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकातील सर्व आमदार महर्षी वाल्मीकी विमानतळावर उतरले आणि श्रीराम जन्मभूमीच्या दर्शनासाठी रवाना झाले. संपूर्ण गटाने एकत्रितपणे ही भेट आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वर्णन केले.