Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
Updated:April 15, 2026 13:51 IST2026-04-15T13:39:36+5:302026-04-15T13:51:31+5:30
IAS Savita Pradhan : IAS सविता प्रधान यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. आयुष्यात असंख्य अडचणींचा सामना करून त्यांनी मोठं यश मिळवलं आहे.

IAS सविता प्रधान यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. आयुष्यात असंख्य अडचणींचा सामना करून त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. सविता प्रधान यांचा जन्म मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात झाला. एका आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या सविता यांचा संघर्ष लहानपणापासूनच सुरू झाला होता.
छोटं गाव, मागासलेला परिसर आणि सोयीसुविधांचा अभाव अशा परिस्थितीत त्यांचं कुटुंब भात कापणी, शेण उचलणं आणि विडीची पानं तोडणं अशी कामं करायचे. सविता यांनीही ही सर्व कामं केली. गावातील बहुतेक लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसत, पण सविता यांच्या पालकांनी मात्र लेकीला शिकवण्याचा निर्णय घेतला. आपल्या गावात दहावी उत्तीर्ण होणारी ती पहिली मुलगी होती.
'जोश टॉल्क्स'मध्ये आपल्या प्रवासाविषयी सांगताना सविता यांनी शालेय दिवसांच्या आठवणी जागवल्या. वडिलांनी त्यांना एका सरकारी शाळेत प्रवेश घेण्याची परवानगी दिली. ती शाळा गावापासून ७ किमी दूर होती. तिथे जाण्या-येण्यासाठी एकच बस असायची, तीही कधी यायची तर कधी नाही.
बसचं भाडे येण्या-जाण्याचे मिळून २ रुपये होते. सविता सांगतात, "त्यावेळी आमची आर्थिक स्थिती रोज २ रुपये खर्च करण्यासारखी नव्हती, त्यामुळे मी अनेकदा चालत शाळेत जायचे. पुढे आईने त्याच गावात एक छोटी नोकरी केली, ज्यामुळे तिथे राहणं आणि शिक्षण घेणं थोडं सोपं झालं."
सविता यांनी दहावीत मिळवलेल्या यशानंतर डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. गावातील इतर मुलं डॉक्टर होण्यासाठी अकरावी मध्ये बायोलॉजी विषय घेत होती, म्हणून त्यांनीही तोच विषय निवडला. शिक्षण पूर्ण होण्याआधीच एका मोठ्या श्रीमंत घरातून लग्नाचं स्थळ आलं आणि हेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी वळण ठरलं. आदिवासी कुटुंबासाठी एवढ्या मोठ्या घरचं स्थळ येणं ही मोठी गोष्ट होती.
लग्न झाल्यावर डॉक्टर होणं सोपं होईल, असा विचार करून वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. पती १० वर्षांनी मोठा असूनही हे लग्न झालं. सासरच्यांनी लग्नानंतर शिक्षण पूर्ण करू देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते खोटे ठरलं. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सविता यांचं लग्न झालं.
वैवाहिक जीवन अत्यंत भयंकर होतं. पती सर्वांसमोर त्यांना धमकावणं, मारहाण करणं आणि अपमानित करणं आता सामान्य झालं होतं. सासरच्या घरी पोटभर जेवण मिळणंही कठीण झालं. नोकराप्रमाणे वागणूक दिली जात असे. सविता सांगतात, "मी अनेकदा अंतर्वस्त्रात पोळी लपवून बाथरूममध्ये जायचे आणि तिथे फक्त कोरड्या पोळीवर भूक भागवायचे."
शारीरिक हिंसा दिवसेंदिवस वाढत गेली. एकदा वडिलांकडे घरी घेऊन जाण्यासाठी विनंती केली असता, त्यांनी संध्याकाळी येतो असं सांगितलं पण ते आले नाहीत. तेव्हा सविता यांना जाणीव झाली की या नरकातून त्यांना वाचवायला कोणीही येणार नाही. यादरम्यान त्या दोन मुलांच्या आई झाल्या होत्या, पण छळ थांबला नाही.
सविता म्हणतात, "माझं डोकं फुटलं होत्ं, हातावर जखमा होत्या, पाठ जळलेली होती. रोजचा हा त्रास आता असह्य झाला होता." एक दिवस त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर त्यांनी हिंमत एकवटली आणि सासरहून पळून गेल्या.
सासर सोडल्यानंतर त्यांनी पार्लरमध्ये काम केलं, ट्यूशन घेतल्या आणि स्वतःचं शिक्षण सुरू ठेवलं. या काळातही पतीने त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्या सांगतात, "एकदा मी परीक्षेला जात असताना पतीने बादलीत लघवी केली आणि ती माझ्या अंगावर फेकली."
"मी पुन्हा आंघोळ केली, कपडे बदलले आणि पेपर द्यायला गेले. माझं मन आता खूप कठोर झालं होतं." सविता यांचं लक्ष सरकारी नोकरी मिळवण्यावर होतं. मुलांचा सांभाळ करत त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात मध्य प्रदेश राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या सरकारी अधिकारी बनल्या.
२०१७ मध्ये त्यांनी UPSC परीक्षेचा फॉर्म भरला आणि पहिल्याच प्रयत्नात त्या 'IAS' अधिकारी झाल्या. आज सविता प्रधान त्यांच्या पदाचा वापर गरीब महिला आणि मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना निर्भय आयुष्य देण्यासाठी करत आहेत.