"ते कॉमेडीचे उस्ताद होते...", असरानींच्या आठवणीत अक्षय कुमार भावुक, 'भूत बंगला'मध्ये दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:14 IST2026-04-15T14:12:49+5:302026-04-15T14:14:02+5:30

'भूत बंगला' सेटवरुन असरानींसोबतचा फोटो शेअर करत अक्षय कुमार म्हणाला...

akshay kumar emotional post for asrani remembering legend says he was ustaad of comedy before release of bhooth bangla | "ते कॉमेडीचे उस्ताद होते...", असरानींच्या आठवणीत अक्षय कुमार भावुक, 'भूत बंगला'मध्ये दिसणार

"ते कॉमेडीचे उस्ताद होते...", असरानींच्या आठवणीत अक्षय कुमार भावुक, 'भूत बंगला'मध्ये दिसणार

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या 'भूत बंगला' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दिवंगत अभिनेते असरानी यांच्या आठवणीत अक्षय भावुक झाला आहे. असरानी यांचा हा शेवटचा सिनेमा ठरला. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अक्षयने असरानी यांना अभिनयातील 'उस्ताद' आणि 'मास्टरक्लास' असे संबोधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आणि असरानी काहीतरी वाचताना दिसत आहेत. हा फोटो 'भूत बंगला'च्या शूटिंगदरम्यानचा आहे. अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, "कधीकधी एक फोटो केवळ आठवणींचा तुकडा नसतो, तर तो एक संपूर्ण प्रवास असतो. हा फोटो आमच्या भूत बंगला शूटिंग सेटवरचा आहे. असरानी यांच्यासोबतचा हा माझा दुसरा शेवटचा चित्रपट. आम्ही एकत्र १२ चित्रपट केले आणि प्रत्येक वेळी मी त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकलो. त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे अभिनयाची कार्यशाळाच असायची."

विनोदी भूमिकांबद्दल बोलताना अक्षयने असरानी यांच्या कौशल्याचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, "जेव्हा असरानी जी पडद्यावर कॉमेडी करायचे तेव्हा ती खूप सोपी वाटायची, पण प्रत्यक्षात ती एक अत्यंत कठीण कला आहे. ते कॉमेडीचे खऱ्या अर्थाने उस्ताद होते आणि नेहमी राहतील. 'भूत बंगला' हा चित्रपट माझ्यासाठी केवळ एक प्रोजेक्ट नसून, त्या महान कलाकाराला वाहिलेली श्रद्धांजली आणि सलाम आहे. असरानी जी, तुमची उणीव नेहमीच भासेल."

गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचे २० ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. असरानी यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक अजरामर भूमिका साकारल्या आहेत. 'भूत बंगला' व्यतिरिक्त ते आगामी 'हैवान' या चित्रपटातही दिसणार आहेत. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील विनोदी अभिनयाचे एक पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा 'भूत बंगला' हा चित्रपट १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे, तर १६ एप्रिल रोजी या चित्रपटाचे 'पेड प्रिव्ह्यू' दाखवले जाणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसह वामिका गब्बी, तब्बू, राजपाल यादव आणि परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'भूल भुलैया'नंतर पुन्हा एकदा प्रियदर्शन, अक्षय आणि जुन्या कलाकारांची फळी एकत्र आल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता आहे.

Web Title : अक्षय कुमार ने असरानी को याद किया, 'भूत बंगला' के सह-कलाकार, भावुक हुए।

Web Summary : अक्षय कुमार ने असरानी को याद करते हुए उन्हें कॉमेडी का उस्ताद बताया, क्योंकि उनकी आखिरी फिल्म 'भूत बंगला' रिलीज हो रही है। अक्षय ने असरानी के कौशल और अभिनय पर उनके प्रभाव को उजागर करते हुए एक हार्दिक श्रद्धांजलि साझा की। फिल्म 17 अप्रैल को रिलीज हो रही है।

Web Title : Akshay Kumar Remembers Asrani, His 'Bhoot Bungla' Co-star, with Emotion.

Web Summary : Akshay Kumar fondly remembers Asrani, calling him a master of comedy, as their last film together, 'Bhoot Bungla,' releases. Akshay shared a heartfelt tribute, highlighting Asrani's skills and influence on his acting. The film releases April 17th.