पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:44 IST2026-04-15T12:42:00+5:302026-04-15T12:44:57+5:30
अमेरिका-इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबिया, कतार, बहरीनसारख्या देशांना टार्गेट केले.

पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आजपासून ४ दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. १५ ते १८ एप्रिल या कालावधीत शरीफ सौदी अरेबिया, तुर्की आणि कतार दौरा करणार आहेत. इराणसोबत अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू असताना ३ महत्त्वाच्या इस्लामिक देशात शहबाज शरीफ यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो. सौदी अरेबिया आणि कतार हे अमेरिकेचे सहकारी देश आहेत. या दोन्ही देशात अमेरिकन सैन्य तळ आहेत. कतार मिडिया इस्लामिक जगाचे नरेटिव्ह सेट करण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. पाकिस्तान या तिन्ही देशांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शहबाज शरीफ दौऱ्याकडे इस्लामिक एकतेचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
पाकिस्तान इराण युद्धात मध्यस्थाची भूमिका घेत स्वत:ची प्रतिष्ठा वाढवू इच्छित आहे. शहबाज शरीफ त्यांच्या दौऱ्यात सौदी अरेबिया, तुर्की आणि कतारच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. पाकिस्तान जगातील एकमेव अण्वस्त्र संपन्न मुस्लीम देश आहे. त्यामुळे पाकिस्तान कायम इस्लामिक देशांची सुरक्षा आणि त्यांच्याकडून लढण्याची पोकळ धमकी देत असतो. त्यामुळे इस्लामिक जगात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी शहबाज शरीफ प्रयत्नशील आहेत. पाकिस्तानने काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियासोबत सुरक्षा करार केला होता. त्यात कुठल्याही एका देशावर हल्ला झाल्यास तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल हे ठरवण्यात आले होते.
अमेरिका-इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबिया, कतार, बहरीनसारख्या देशांना टार्गेट केले. पाकिस्तान या देशांना समर्थन देत आला आहे. त्यात युद्धाची परिस्थिती उद्भवली तर सौदी अरेबियाची साथ देणार असल्याचं पाकिस्तानने म्हटलं होते. पाकिस्तानचं सरकार सौदी अरेबिया, कतारसारख्या देशांनी दिलेल्या आर्थिक मदतीवर निर्भर आहे. त्यात इराणने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने कुठलीही मदत न केल्याने UAE ने पाकिस्तानला दिलेले कर्ज पुन्हा मागितले. त्यामुळे पाकिस्तानसाठी कतार, सौदी अरेबिया गरजेचा आहे. पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम करून शांतता चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला परंतु ही चर्चा निष्फळ ठरली.
संयुक्त अरब अमिरातने काही दिवसापूर्वी पाकिस्तानकडे आपल्या पैशांची मागणी केली आहे. पाकिस्तानला या महिन्यात सौदी अरेबियाला ३.५ अब्ज डॉलर्स परत करायचे आहेत. जर पाकिस्तानने हे पैसे परत केले तर काही दिवसांतच त्यांचा परकीय चलन साठा संपुष्टात येईल. हे टाळण्यासाठी पाकिस्तान सौदी अरेबिया आणि चीनकडून पैशांची मागणी करत आहे. हे दोन्ही देश मिळून पाकिस्तानला ३.५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज देऊ शकतात असं बोलले जाते. त्यात शहबाज शरीफ यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो.