Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 08:42 IST2026-05-04T08:35:50+5:302026-05-04T08:42:39+5:30

Tamil Nadu Elections 2026 Result Today: तामिळनाडूच्या राजकारणाचे पडदे पुन्हा एकदा उघडले असून, यंदाची २०२६ ची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत आहे. राज्याच्या राजकारणात नेहमीच चित्रपटसृष्टीचा मोठा प्रभाव राहिला आहे आणि यावेळीही अनेक दिग्गज कलाकार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.

या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा सुपरस्टार विजय थलापती यांची आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये 'तामिळगा वेत्री कळघम' या पक्षाची स्थापना केल्यानंतर विजय आता थेट मैदानात उतरले आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्ष कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवत आहे. चित्रपटसृष्टीत अनेक दशके राज्य केल्यानंतर, विजय आता सत्ताधारी द्रमुकला कडवे आव्हान देत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर भाजपच्या तिकिटावर २०२६ ची निवडणूक लढवत आहेत. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी चित्रपटसृष्टीशी नाते तोडलेले नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सुबेदार' चित्रपटात त्या अनिल कपूरसोबत दिसल्या होत्या. एक अभिनेत्री आणि निर्माती म्हणून सक्रिय असतानाच त्या आता भाजपचे प्रतिनिधित्व करत मतदारांना साद घालत आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन पुन्हा एकदा सत्तेत परतण्यासाठी ताकद लावत आहेत. राजकारणात येण्यापूर्वी स्टालिन यांनीही रुपेरी पडद्यावर काम केले आहे. त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी लिहिलेल्या 'ओरे रत्थम' आणि 'मक्कल आनई इट्टाल' सारख्या चित्रपटांत ते दिसले होते. त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टालिन हे देखील प्रचारात आघाडीवर असून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अभिनेत्री गौतमी तडीमाल्ला यावेळी एआयएडीएमकेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. १९९७ मध्ये भाजपमधून राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या गौतमी यांनी २०२४ मध्ये भाजपची साथ सोडून एआयएडीएमकेमध्ये प्रवेश केला. 'थेवर मगन' आणि 'इरुवर' सारख्या क्लासिक चित्रपटांतील स्टार राहिलेल्या गौतमी आता जनसेवेच्या भूमिकेत आहेत.

अभिनेते आर. सरथकुमार यंदा एनडीए आघाडीसाठी जोरदार प्रचार करत आहेत. त्यांचा पक्ष आता भाजपमध्ये विलीन झाला आहे. 'हिट लिस्ट', 'नट्टामाई' यांसारख्या चित्रपटांतून सतत प्रेक्षकांच्या भेटीला येणारे सरथकुमार राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत.