West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 09:53 IST2026-05-04T09:52:50+5:302026-05-04T09:53:54+5:30
Mamata Banerjee: पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालाआधी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून, सुरुवातीपासूनच सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मात्र, मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. भाजपने ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमरे बंद केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
"जनतेचा कौल बदलण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड केली जात आहे. ज्याप्रमाणे मी रात्रभर जागी राहून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही रात्रभर जागून स्ट्राँग रूमबाहेर पहारा द्या. लोकांच्या मतांचे रक्षण करणे, ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे", असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, "जर कुठेही संशयास्पद हालचाली दिसल्या, तर कार्यकर्त्यांनी तात्काळ त्या परिसराला घेराव घालावा. कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे तातडीने लेखी तक्रार नोंदवावी. जर प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड किंवा वीज कपातीचे कारण दिले जात असेल, तर ते मान्य न करता तात्काळ सीसीटीव्ही फुटेजची मागणी करावी. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सतर्क आणि सक्रिय राहावे."
बंगालमधील वातावरण तापले
ममता बॅनर्जींच्या या विधानानंतर बंगालमधील राजकीय वातावरण मतमोजणीपूर्वीच तापले आहे. एकीकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असतानाच, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता या चुरशीच्या लढतीमध्ये बंगालची जनतेने कुणाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे, हे स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.