आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:35 IST2026-05-04T10:33:28+5:302026-05-04T10:35:01+5:30
Assam Assembly Election Result 2026: ईशान्य भारतातील प्रमुख राज्य असलेल्या आसाममध्ये भाजपाने विजयी हॅटट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात
ईशान्य भारतातील प्रमुख राज्य असलेल्या आसाममध्येभाजपाने विजयी हॅटट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. येथे हिंमता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या भाजपाने आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये राज्यातील १२६ जागांपैकी ९५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना अवघ्या २९ जागांवर आघाडी मिळाली असून, इतरांच्या खात्यात २ जागा जाताना दिसत आहे.
आसाममध्ये २०१६ पासून सत्तेवर असलेल्या भाजपाने ही निवडणूक मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. तसेच हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप झाल्याने मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीपासून भाजपाने आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे.
आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपा आणि मित्र पक्षांना मिळून ९५ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यातही राज्यात बहुमतासाठी लागणाऱ्या ६४ जागांचा आकडा भाजपाने स्वबळावर पार केला आहे. तसेच २०२१ ला झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपा आणि मित्रपक्षांच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि मित्रपक्षांची जोरदार पिछेहाट झाली असून, सध्या ते केवळ २९ जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्षांना केवळ २ जागांवर आघाडी मिळाली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार आसाममधील ११९ जागांचे कल समोर आले असून, त्यात भाजपा ७३, काँग्रेस २३, बीओपीएफ ९, आसाम गण परिषद ९, एआययूडीएफ २ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत.
