ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:49 IST2026-05-04T10:49:20+5:302026-05-04T10:49:48+5:30
टीवीकेने निकालात मुसंडी मारली असून अभिनेता विजय यांच्या यशाने सगळेच आश्चर्यचकीत आहेत

ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालांमध्ये सत्ताधारी डीएमकेला जोरदार धक्का बसला आहे. याठिकाणी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेता विजय थलापती यांच्या TVK पक्षाने घवघवीत यश मिळवल्याचे दिसून येते. राज्यातील एकूण २३४ जागांपैकी १०० हून अधिक जागांवर TVK पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. मतमोजणी अद्याप सुरू असून टीवीके १०६, एआयडिएमके - ७४ तर सत्ताधारी डीएमके ५५ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
सुरुवातीच्या निकालांमधील कल पाहता डीएमकेच्या चेन्नई येथे विजयी जल्लोष कार्यक्रमावर विरजन पडले आहे. ठिकठिकाणी लावलेले तंबू हटवण्यात आले आहेत. टीवीकेने निकालात मुसंडी मारली असून अभिनेता विजय यांच्या यशाने सगळेच आश्चर्यचकीत आहेत. सुरुवातीला डीएमके आघाडीवर असल्याचे चित्र होते परंतु काही वेळातच अभिनेता विजय यांच्या टीवीके पक्षाने ब्लॉकबस्टर एन्ट्री घेत आघाडीला सुरुवात केली. तामिळनाडूत बहुमतासाठी ११८ जागांची गरज आहे. त्यात १०० हून अधिक जागांवर टीवीके आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ भाजपा एआयडिएमके आघाडीने बाजी मारली आहे तर सत्ताधारी डीएमके तिसऱ्या स्थानावर फेकली आहे.
यावेळी तामिळनाडूमध्ये एकूण ५ कोटी ७३ लाखाहून अधिक मतदार होते. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात यंदा विक्रमी मतदान झाले असून एकूण मतदानाची टक्केवारी ८४.६९ टक्के होती. तामिळनाडूच्या निवडणूक इतिहासातील ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मानली जाते. त्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या टीवीके पक्षाने विद्यमान सत्ताधारी डिएमकेसोबतच एआयडिएमके यांनाही धक्का दिला आहे. अनेक ठिकाणी टीवीकेच्या उमेदवारांनी या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना मागे टाकले आहे.
तामिळनाडूतील मुख्य लढत डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात होती. परंतु अभिनेता विजयने स्थापन केलेल्या तामिळगा वेट्टी कझगम (टीवीके) पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उभे करून अधिक रंजक आणली होती. निवडणुकीनंतरच्या एक्झिट पोलमध्ये विजय यांच्या पक्षाला आघाडी मिळत असल्याचे दिसून आले होते. अभिनेता विजय तामिळनाडूमध्ये किंगमेकरची भूमिका बजावू शकतो असं सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्ष निकालात विजय यांच्या पक्षाची सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.