West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 09:30 IST2026-05-04T09:28:31+5:302026-05-04T09:30:38+5:30
मुर्शिदाबादमध्ये एकूण २२ विधानसभा जागा आहेत. सुरुवातीच्या कलानुसार टीएमसी सर्व २२ जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा शून्यावर आहे. बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक मुस्लिम बहुल भाग आहे.

West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजपाने शतक झळकावले आहे. निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ११५ जागांवर आघाडीवर आहे. टीएमसी १०५ जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष तीन जागांवर आघाडीवर आहेत. भाजपाने गेल्या वेळी तुफानगंजची जागा जिंकली होती. यावेळीही भाजपाचा उमेदवार आघाडीवर आहे. भाजपाचे पवन सिंह आघाडीवर आहेत. त्याशिवाय पहिल्यांदाच निवडणूक लढणारे टीएमसीचे कुणाल घोष हेदेखील आघाडीवर आहेत.
५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
बंगालमधील २०० हून अधिक जागांचे कल समोर आले आहेत. उत्तर दिनाजपूरमध्ये भाजपा ५ जागांवर आघाडीवर आहे तर टीएमसी ४ जागांवर पुढे आहे. मुर्शिदाबादमध्ये एकूण २२ विधानसभा जागा आहेत. सुरुवातीच्या कलानुसार टीएमसी सर्व २२ जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा शून्यावर आहे. बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक मुस्लिम बहुल भाग आहे. येथे ६५% लोकसंख्या मुस्लिम आहे. पूर्व वर्धमानमध्ये भाजपा १३ जागांवर आघाडीवर आहे. दक्षिण २४ परगणामध्ये भाजपा अद्याप शून्यावर आहे. रूपा गांगुली देखील पिछाडीवर आहेत. दार्जिलिंगमध्ये भाजपा पाच जागांवर आघाडीवर आहे. टीएमसीने येथे खाते उघडलेले नाही.
हावडामध्ये भाजपा १० जागांवर आघाडीवर आहे. येथे टीएमसीने चार जागा जिंकल्या आहेत. मालदामध्ये भाजपा पिछाडीवर आहे. उत्तर बंगालमध्ये भाजपाची भक्कम आघाडी आहे. झाडग्राममधील सर्व चार जागांवर भाजपा आघाडीवर आहे. झारग्राममध्ये जिथे भाजपाने गेल्या वेळी एकही जागा जिंकली नव्हती तिथे यंदा ते चारही जागांवर आघाडीवर आहेत. पंतप्रधान मोदींनी येथे खाल्लेल्या झारमुरीने जादू केली असे मानले जाते. रासबिहारीमध्ये भाजपाचे सपानदास गुप्ता आघाडीवर आहेत. बंगालमध्ये टीएमसीने पहिल्यांदा रासबिहारीमध्येच जागा जिंकली होती.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या दोन टप्प्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ७७ मतमोजणी केंद्रांवर सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील २९४ विधानसभा जागांपैकी केवळ २९३ जागांचीच मतमोजणी होत होती, कारण भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील पूरी फाल्टा विधानसभा जागेसाठी २१ मे रोजी फेरमतदान होणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचा निकाल २४ मे रोजी जाहीर केला जाईल. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रांची संख्या २०२१ मधील १०८ आणि २०१६ मधील ९० वरून यावेळी ७७ पर्यंत कमी केली आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रांची संख्या ८७ पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अखेरीस ही संख्या ७७ पर्यंत कमी करण्यात आली. मतमोजणी केंद्रांच्या आत आणि आजूबाजूला त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. सर्वात आतील स्तर म्हणजेच मतमोजणी कक्षात केवळ केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांच्या संरक्षणाखाली असेल.