Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 16:25 IST2026-05-17T16:16:04+5:302026-05-17T16:25:09+5:30
Benefits of Shaving Your Head: उन्हाळ्यात टक्कल करण्यामागे केवळ फॅशन नसून त्यामागे आरोग्यदायी आणि वैज्ञानिक कारणे आहेत.

उष्णतेपासून आराम आणि शरीराचे तापमान नियंत्रण: आपल्या शरीरातील उष्णता प्रामुख्याने डोक्यावाटे बाहेर पडत असते. डोक्यावर दाट केस असल्यास उष्णता कोंडून राहते, ज्यामुळे जास्त गरम होते आणि अस्वस्थता वाढते. टक्कल केल्यामुळे डोक्याच्या त्वचेचा थेट हवेशी संपर्क येतो. यामुळे घाम लवकर सुकतो आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहून कमालीचा गारवा व आराम मिळतो. (AI Image)

घाम आणि दुर्गंधीपासून सुटका: उन्हाळ्यात डोक्यात मोठ्या प्रमाणावर घाम येतो. केसांमुळे हा घाम त्वचेवरच साचून राहतो आणि केस चिकट होतात. घामामुळे डोक्याला दुर्गंधी येण्याची समस्याही उद्भवते. टक्कल केल्याने घाम साचत नाही आणि डोके स्वच्छ व कोरडे राहते. (AI Image)

डोक्याची खाज आणि इन्फेक्शन रोखण्यासाठी: घामामुळे डोक्याच्या त्वचेवर बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्याचा धोका असतो. यामुळे उन्हाळ्यात डोक्यात खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा घामोळ्या होणे अशा समस्या उद्भवतात. टक्कल केल्याने डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवणे सोपे जाते आणि कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही. (AI Image)

कोंड्याच्या समस्येवर जालीम उपाय: उन्हाळ्यात घाम आणि धुळीमुळे केसांमध्ये कोंडा खूप वाढतो. अनेकदा महागडे शॅम्पू वापरूनही कोंडा जात नाही. अशा वेळी टक्कल केल्याने डोक्याची त्वचा थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते. सूर्यप्रकाशातील युव्ही किरणांमुळे कोंडा निर्माण करणारे फंगस नष्ट होते आणि कोंड्याची समस्या मुळापासून संपते. (AI Image)

केसांची देखभाल करणे सोपे: उन्हाळ्यात दिवसातून दोनदा अंघोळ करावी लागते. लांब किंवा दाट केस असतील, तर ते वारंवार धुणे, सुकवणे आणि विंचरणे त्रासाचे ठरते. टक्कल केल्यावर केसांची निगा राखण्याचा, शॅम्पू किंवा तेल लावण्याचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात. (AI Image)

नवीन केसांची वाढ चांगली होण्यासाठी: अनेक लोकांचा असा विश्वास असतो की उन्हाळ्यात टक्कल करून घेतल्याने जुने खराब झालेले, दुभंगलेले केस निघून जातात. त्यानंतर येणारे नवीन केस हे अधिक निरोगी, मजबूत आणि दाट येतात. खासकरून लहान मुलांचे जावळ उन्हाळ्यात काढण्यामागे हे एक मोठे कारण असते. (AI Image)

















