आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 16:50 IST2026-05-17T16:49:21+5:302026-05-17T16:50:25+5:30
सोशल मीडियावर एका १९ वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा मुलगा कोणत्याही मोठ्या रेस्टॉरंटचा शेफ नसून मार्केटमध्ये फ्राईड राईसची गाडी लावतो.

आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
सोशल मीडियावरचीनमधील एका १९ वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा मुलगा कोणत्याही मोठ्या रेस्टॉरंटचा शेफ नसून मार्केटमध्ये फ्राईड राईसची गाडी लावतो. पण त्याची काम करण्याची पद्धत इतकी व्हीआयपी (VIP) आहे की, तो सूट-बूट घालून, केसांची खास स्टाईल करून आणि तोंडात सिगारेट पकडून जेवण बनवतो. या अनोख्या स्टाईलच्या जोरावर तो दरमहा लाखो रुपयांची कमाई करत आहे.
चीनच्या पूर्व शेंडोंग प्रांतातील यानताई शहरातील ही घटना आहे. या मुलाचं आडनाव 'लू' आहे. लू अवघ्या १७ वर्षांचा असताना, त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या कडेला फ्राईड राईस विकण्याचं काम सुरू केलं होतं. आज १९ व्या वर्षी तो आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत आहे. सुरुवातीच्या दिवसांत त्याचं काम अगदी सामान्य होतं, पण नंतर त्याने आपल्या व्यवसायाला एक नवा ट्विस्ट देण्याचा निर्णय घेतला.
सूट घालून बनवतो जेवण
लूने एक दिवस विचार केला की आपलं काम थोडं अधिक चांगलं आणि सुसंस्कृत दिसलं पाहिजे. त्याने छंद म्हणून सूट घालून जेवण बनवण्यास सुरुवात केली. खरं तर त्याचा हा लुक प्रसिद्ध जपानी अॅनिमे सीरिज 'वन पीस' मधील 'सांजी' या पात्रापासून प्रेरित आहे, जो एक अत्यंत स्टायलिश शेफ आहे. आपला हा लुक अधिक खरा वाटण्यासाठी लू जेवण बनवताना तोंडात एक सिगारेट देखील पकडून ठेवतो, अर्थात तो ती कधीच पेटवत नाही.
कढई उडवण्याची अनोखी स्टाईल
लूचा फक्त लुकच नाही, तर जेवण बनवण्याची पद्धतही एखाद्या चित्रपटातील सीनसारखी आहे. तो जेवण बनवताना कॅमेऱ्याकडे पाहून डोळा मारतो, आपले केस मागे सेट करतो आणि जेव्हा त्याचे वडील पाठीमागून अंडं फेकतात, तेव्हा तो ते हवेतच झेलतो. यासोबतच जड कढई हवेत उडवण्यातही तो पटाईत आहे. सोशल मीडियावर त्याच्या या हटके अंदाजानी धुमाकूळ घातला असून त्याचे ४६,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.
दररोज विकल्या जातात २०० हून अधिक प्लेट्स
लूची ही गाडी रोज संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११:३० वाजेपर्यंत सुरू असते. गर्दीच्या वेळी लू न थकता सलग अनेक तास काम करतो. तो अवघ्या ३ मिनिटांत फ्राईड राईसची एक प्लेट तयार करतो. दररोज २०० हून अधिक फ्राईड राईसच्या प्लेट्स विकल्या जातात. एका प्लेटची किंमत १० युआन (सुमारे १२० रुपये) आहे. या हिशोबाने महिन्याचा टर्नओव्हर ५०,००0 युआन (७ लाख) आहे, ज्यामधून सर्व खर्च वजा करून तो दरमहा २०,००० युआन (सुमारे २.५ लाख रुपये) नफा कमावतो.
अप्रतिम चव
इंटरनेटवर काही लोकांनी त्याच्या इतक्या मोठ्या कमाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. याला उत्तर म्हणून लूने लाईव्ह-स्ट्रीमिंग करून लोकांना दाखवलं की तो एकाच वेळी कढईत अनेक प्लेट्स कशा तयार करतो. लूचं म्हणणं आहे की, त्याने सुरुवातीला धावपळीच्या आयुष्यात थोडी गंमत आणण्यासाठी सूट घालण्यास सुरुवात केली होती, पण ग्राहकांकडून इतकं प्रेम मिळेल याचा त्याने विचार केला नव्हता. लूने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली की, "लोक सुरुवातीला उत्सुकतेपोटी माझ्या गाडीकडे येतात, पण जी गोष्ट त्यांना वारंवार इथे खेचून आणते, ती म्हणजे माझ्या फ्राईड राईसची अप्रतिम चव!"