पगार सोडून 'वरची कमाई' भोवली! राज्यात १० वर्षांत ७ हजार ८८६ लाचखोरांवर एसीबीचा स्ट्राईक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:11 IST2026-05-06T13:03:22+5:302026-05-06T13:11:31+5:30
एसीबीचा लाचखोरांवर स्ट्राईक! १० वर्षांत हजारो गुन्हे नोंद; गेल्या दशकातील सापळा कारवाईचा संपूर्ण तपशील.

पगार सोडून 'वरची कमाई' भोवली! राज्यात १० वर्षांत ७ हजार ८८६ लाचखोरांवर एसीबीचा स्ट्राईक!
- राजन मंगरूळकर
परभणी : काही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना मिळणारा पगार सोडून वर कमाई हवीशी वाटते. यातच खिसा भरण्यासाठी काही जणांकडून चिरीमिरी घेतली जाते. अशा पद्धतीने कमाई करणाऱ्यांच्या मलाईवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची करडी नजर असते. या विभागाकडून अशा लाच घेणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हे नोंद केले जातात. राज्यात मागील दहा वर्षात विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मिळून एकूण ७ हजार ८८६ यशस्वी सापळे केले आहेत.
शासकीय कार्यालयांमध्ये किंवा निमशासकीय तसेच महामंडळ व अन्य विभागात सर्वसामान्य नागरिकांना त्यांची कामे योग्य वेळेत व्हावीत असे वाटते. मात्र, काही ठिकाणी या कामामध्ये अधिकारी, कर्मचारी लाचेची मागणी करून खोडा घालतात. लाचखोरांना वेळीच रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लाच देऊ नका, यासाठी विविध माध्यमातून नागरिकांत जनजागृती केली जाते. विविध शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी याबाबत फलक लावले जातात. लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे. याविषयी माहिती असताना देखील अनेकजण लाच मागणी करत असल्याचे समोर येते. अशा लाचखोरांवर संबंधित विभागाकडून कारवाई अन् गुन्हा नोंद केला जातो. तक्रारदार देखील सजग झाल्याने माहिती देण्यासाठी पुढे येत असून यातूनच विविध ठिकाणी हे सापळे यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत.
वर्षनिहाय सापळे
सन २०१६ ९८५
सन २०१७ ८७५
सन २०१८ ८९१
सन २०१९ ८६६
सन २०२० ६३०
सन २०२१ ७६४
सन २०२२ ७२८
सन २०२३ ७९५
सन २०२४ ६८३
सन २०२५ ६६९
दाखल गुन्ह्यांचा आलेख उतरता
सन २०१४ मध्ये १ हजार २४५, सन २०१५ मध्ये १ हजार २३४ एवढ्या सापळा कारवाई झाल्या होत्या. या दोन वर्षात हजारपेक्षा अधिक सापळे होते. मात्र, त्यानंतर सन २०१६ पासून ते सन २०२५ पर्यंत दरवर्षी सातत्याने गुन्ह्यांचा आलेख संख्यात्मक तुलनेत उतरता झाला आहे.
एसीबीचे राज्यात आठ परिक्षेत्र
पोलिस यंत्रणेतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एकूण आठ परिक्षेत्र आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या परिक्षेत्रांचा समावेश होतो. या परिक्षेत्रात विविध जिल्हे समाविष्ट आहेत. सापळा कारवाई सोबतच अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचाराची देखील गुन्हे नोंद होतात.