अमेरिका-इराण संघर्षामुळे संपूर्ण जगालाच इंधन संकटाचा सामना करावा लागत आहे. यातच भारतातील सर्वसामान्य जनतेसाठी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजीच्या किमतींसंदर्भात एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही. केवळ व्यावसायिक (Commercial) एलपीजीच्या दरातच वाढ करण्यात आली आहे, असे सहसचिव सुजाता शर्मा यांनी एका आंतरमंत्रालयीन बैठकीत स्पष्ट केले आहे.
याशिवाय, मे महिन्याच्या मध्यापर्यंत 'नयारा' ऑपरेशन्स सुरू करेल. यानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या क्रूड युनिटच्या देखभालीसाठी तीन ते चार आठवडे कामकाज बंद ठेवणार आहे, असेही सुजाता शर्मा यांनी यावेळी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती -
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता, गेल्या ३० एप्रिलला ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १२६ डॉलर्सपर्यंत पोहोचल्या होत्या. अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही उच्चांकी पातळी होती. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील तणावामुळे तेल टँकरच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, हा इतिहासातील सर्वात मोठा पुरवठा अडथळा असल्याचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) म्हटले आहे. खरेतर यामुळे संपूर्ण जगालाच उर्जा अथवा इंधन संकटाचा सामना करावा लागला आहे.
कच्च्या तेलाचे दर ९ टक्क्यांनी घसरले -
अमेरिका आणि इराणमध्ये लवकरच शांतता करार होऊ शकतो, असे वृत्त 'Axios'ने प्रसिद्ध केले आहे. यानंतर, बुधवारी ब्रेंट क्रूडच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. कच्च्या तेलाचे दर ९ टक्क्यांनी घसरले असून ९९.७९ डॉलर्स प्रति बॅरलवर आले आहेत. यापूर्वीही ७ टक्क्यांची घसरण दिसून आली होती. अमेरिकन अधिकारी आणि काही सूत्रांच्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसने संकेत दिले आहेत की त्यांनी इराणसोबत युद्ध संपवण्यासाठी आणि अणु वाटाघाटींसाठी एक चौकट तयार करण्याच्या उद्देशाने एक करार अंतिम केला आहे.
