काळाचा क्रूर घाला! कोठ्याला आग लागून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू;गायी, शेळ्या, १५० कोंबड्या खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:28 IST2026-05-06T12:27:45+5:302026-05-06T12:28:53+5:30
आगीत वृद्धासह दहा गायी, पंधरा शेळ्या, दीडशे कोंबड्या मृत; धारूर तालुक्यातील काळजाला चटका लावणारी घटना

काळाचा क्रूर घाला! कोठ्याला आग लागून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू;गायी, शेळ्या, १५० कोंबड्या खाक
धारूर : तालुक्यातील रेपेवाडी येथे मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेपेवाडी येथील अशोक रामभाऊ रेपे यांच्या घराशेजारील कोठ्याला मंगळवारी सायंकाळी आठ ते नऊच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वाळलेला चारा आणि लाकडी साहित्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.
वृद्ध वडिलांचा दुर्दैवी अंत
आग लागली तेव्हा अशोक रेपे यांचे वडील रामभाऊ एकनाथ रेपे हे गोठ्यात होते. आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की, त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पशुधनाची मोठी हानी
या आगीत केवळ जीवितहानीच नाही, तर रेपे कुटुंबाचे आर्थिक कंबरडेही मोडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत सुमारे १० गायी, १५ शेळ्या, १५० कोंबड्या जळून खाक झाल्या आहेत. कोठ्यात साठवून ठेवलेला चारा आणि इतर शेती उपयोगी साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.
प्रशासनाकडून पाहणी व पंचनामा
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार श्रीकांत निळे आणि धारूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.