Manohar Mama Bhosale News : राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून, आरोपीला मोबाइल वापरण्यास-दिल्यामुळे कुडूवाडी पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक बाळासाहेब दाढे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओची गंभीर दखल घेत तातडीने ही कारवाई केली. या निर्णयामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
भोंदूबाबा मनोहर भोसलेसह साथीदार विशाल वाघमारे याला कुईवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच पुणे येथील मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गोपनीयता बाळगून ताब्यात घेऊन कुडूवाडी पोलिस ठाण्यात आणून तपासासाठी व माढा न्यायालयासमोर उभे करण्यासाठी ठेवले होते, यादरम्यान त्याला कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता.
यावेळी कुडूवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक बाळासाहेब दाढे यांनी भोंदूबाबा मनोहर भोसलेचा साथीदार विशाल वाघमारे याला आपला मोबाइल फोन देऊन कोणाशी तरी बोलणे करून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्याची गंभीर दखल घेत तातडीने त्यांना निलंबित करून या कालावधीत सोलापूरच्या मुख्यालयात नेमणूक करण्यात आली.
कुडूवाडी पोलिस ठाण्यात सोलापूरच्या फिर्यादीकडून आमिष दाखवून व जादूटोणाप्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबा मनोहर भोसले, विशाल वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा नोंदला होता. त्यामुळे कुईवाडी पोलिसांनी पुणे मांजरी येथून दोघांना तातडीने ताब्यात घेण्यात घेतले होते.
गोपनीय कक्षात आणून ठेवल्यानंतर तिथे असलेल्या पोलिस नाईक दाढे यांनी आपल्या मोबाइलवरून आरोपी विशालला कोणाशी तरी बोलणे करून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे राज्यात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणाबाबत तपासात पोलिस अधीक्षकांच्या कडक सूचना असतानाही आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत दाढे यांना पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले.
भोसलेचा मुक्काम करमाळा जेलमध्ये; सीसीटीव्हीच्या निगराणीत
करमाळा : भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम सध्या करमाळा जेलमध्ये सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून, त्याला बाहेरचे जेवण न देता इतर कैद्यांप्रमाणे जेलचा भत्ता जेवण म्हणून देण्यात येत आहे.
भोंदू मनोहर भोसलेने धनकवडी (पुणे) येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार वाघमारे यास मंगळवारी करमाळा न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली आहे.
मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार वाघमारेचा सध्या करमाळा जेलमध्ये मुक्काम आहे. यापूर्वी कुडूवाडी पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात सुद्धा मनोहर भोसले यास करमाळा येथील कोठडीत ठेवण्यात आलेले होते.
माढा न्यायालयाने मनोहर भोसलेसह अन्य दोघा आरोपींना न्यायालयीन कस्टडी सुनावल्यानंतर सोलापूर येथील जेलमध्ये त्याला पाठवण्यात आलेले होते. दरम्यान करमाळा येथील गुन्ह्यात मनोहर भोसले यास करमाळा जेलमधील क्रमांक एकच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे.
मनोहर भोसले याच्यावर सीसीटीव्हीची निगराणी असून, मनोहर भोसले भेटण्यासाठी अनेक भक्त पोलिस ठाण्याकडे चकरा मित्र आहेत; परंतु पोलिस कोणासही भेटण्यास परवानगी देत नाहीत.
कमालीची गोपनीयता
याबाबतही कमालीची गोपनीयता ठेवली आहे. पोलिस नाईक दाढे सध्या सोलापूर मुख्यालयात दैनंदिन हजेरी देत आहेत. संबंधित आरोपी हे सध्या करमाळा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात सात दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत.
मनोहर भोसले प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याने याबाबत माहिती देणे उचित ठरणार नाही. पोलिस नाईक बाळासाहेब दाढे याच्यावरील निलंबन कारवाईविषयी वरिष्ठांकडे संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तो सध्या वरिष्ठांच्या आदेशान्वये सोलापूर मुख्यालयाकडे आहे, अशी माहिती कुर्डुवाडीचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी दिली.
Web Summary : In the Manohar Bhosle case, a policeman was suspended for providing a mobile phone to an accused. The video went viral, prompting swift action. Bhosle is currently in jail under CCTV surveillance.
Web Summary : मनोहर भोसले मामले में, आरोपी को मोबाइल फोन देने के आरोप में एक पुलिसकर्मी को निलंबित कर दिया गया। वीडियो वायरल होने के बाद तत्काल कार्रवाई हुई। भोसले फिलहाल जेल में सीसीटीवी की निगरानी में है।