Join us
Daily Top 2Weekly Top 5

MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 09:25 IST

MS Dhoni as Highest Taxpayer: आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान बिहार-झारखंडमधून अंदाजे २० हजार कोटी रुपयांची करवसुली केली, यातील १२ हजार कोटी रक्कम फक्त झारखंडमधून जमा करण्यात आली आहे. तर, या दोन्ही राज्यांमध्ये भारताच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती ठरला आहे.

आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान बिहार-झारखंडमधून अंदाजे २० हजार कोटी रुपयांची करवसुली केली, यातील १२ हजार कोटी रक्कम फक्त झारखंडमधून जमा करण्यात आली आहे. तर, या दोन्ही राज्यांमध्ये भारताच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती ठरला आहे, अशी माहिती आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त (बिहार-झारखंड), डॉ. डी. सुधाकर राव यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

डॉ. डी. सुधाकर राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार- झारखंड करवसुलीतील एकूण ७० टक्के रक्कम टीडीएसद्वारे जमा झाली आहे. बिहार आणि झारखंडमध्ये एकूण ५.५ कोटी पॅनधारक आहेत. त्यापैकी केवळ ४० लाख लोकच आयटीआर भरतात.  विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, बिहार आणि झारखंडमधील कंपन्यांच्या बाबतीत, सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड, भारत कोकिंग कोल लिमिटेड आणि सीएमपीडीआय या कंपन्यांनी सर्वाधिक कर भरला आहे. 

धोनीने ठरला सर्वाधिक टॅक्स देणारा व्यक्ती

दरम्यान, महेंद्रसिंह धोनी हा गेल्या आर्थिक वर्षात बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये मिळून सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती ठरला आहे, अशीही माहिती सुधाकर राव यांनी दिली. परंतु, त्यांनी धोनीने भरलेल्या कराच्या अचूक तपशीलांची माहिती देण्याचे टाळले. cleartax.in या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये करापोटी एकूण ३८ कोटी रुपये भरले होते. 

शेवटचा आयपीएल ठरण्याची शक्यता

महेंद्रसिंह धोनीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा भाग आहे. मात्र, दुखापतीमुळे त्याला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकही सामना खेळता आला नाही. तरीही, तो आपल्या सहकारी खेळाडूंसोबत नियमितपणे सराव करत आहे. सध्याचा आयपीएल हंगाम हा त्याचा शेवटचा असू शकतो, असे मानले जाते.

कोणत्याही राज्याचे कर योगदान हे केवळ सरकारी तिजोरीतील आकडेवारी नसून, ते त्या राज्याच्या आर्थिक सक्षमतेचे आणि विकासाचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. महाराष्ट्र आणि गुजरातसारखी राज्ये औद्योगिक केंद्र असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर गोळा होतो. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील प्रगतीमुळे कर उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. राज्याला मिळणारे हे कर उत्पन्न पुन्हा जनतेच्याच कल्याणासाठी वापरले जाते, यात पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : MS Dhoni: Top Taxpayer in Bihar-Jharkhand, ₹20,000 Crore Revenue

Web Summary : Bihar-Jharkhand's tax revenue reached ₹20,000 crore, with Dhoni as the highest individual taxpayer. TDS contributed 70%. Despite Dhoni's IPL injury, he remains active, possibly marking his last season. Tax revenue fuels state development.
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीबिहारझारखंडइन्कम टॅक्स