08 May, 26 12:43 PM
नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला एमआयएमचा आसरा
नाशिक धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून निदा खानला रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली आहे. मतीन पटेल यांनी निदा खानला कौसर पार्कमधील फ्लॅटमध्ये लपवल्याचा आरोप आहे.
08 May, 26 12:40 PM
चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
शुभेंदु अधिकारी आणि चंद्रनाथ यांच्या आईने थेट तृणमूल काँग्रेसला (TMC) आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. चंद्रनाथ रथ यांची आई हासीरानी रथ यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी थेट 'टीएमसी'ला जबाबदार धरलं आहे. त्या म्हणाल्या, "ही टीएमसीची गुंडगिरी आहे, त्यांच्याच सांगण्यावरून हे झालं आहे. माझा मुलगा गेला, आता मला न्याय हवा आहे. मी अशी मागणी करते की, दोषींना फाशी देऊ नका, तर त्यांना जन्मठेप द्यावी. मी सुद्धा एक आई आहे आणि माझ्यासारख्या इतर कोणत्याही आईचा मुलगा मरू नये असं वाटतं." वाचा सविस्तर
08 May, 26 12:33 PM
आम्ही सावध केले होते, पण त्याकडे दुर्लक्ष केले, प्रकाश आंबेडकरांची नाराजी
ममता बॅनर्जी यांनी राज्यघटनेचे पालन करून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी स्पष्ट मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आम्ही विविध माध्यमांतून ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपच्या विषारी डावपेचांबाबत वेळोवेळी सावध केले होते. मात्र, त्यांनी आमच्या इशाऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या जनतेने सध्याचा जनादेश दिलेला नाही आणि त्यांनी या जनमताचा आदर राखायला हवा असं त्यांनी म्हटलं आहे.
08 May, 26 11:14 AM
शिक्षण मंडळाने जाहीर केला दहावीचा निकाल
यंदा दहावाची निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभाग अव्वल आहे. ९७.६२ टक्के कोकणाचा निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगरचा आहे. दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ६४ विषयांच्या परीक्षेत २० विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
08 May, 26 10:55 AM
भाजपा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आज जाहीर करणार
पश्चिम बंगालमध्ये आज केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, ओडिशा मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या नेतृत्वात भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचा निर्णय होणार आहे.
08 May, 26 10:09 AM
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक, कुठे सापडली?
नाशिक येथील टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या २५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खानला गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. तिच्या अटकेमुळे या प्रकरणातील अनेक मोठी गुपिते उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
08 May, 26 10:07 AM
दहावीचा निकाल कसा, कुठे पाहाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. ८ मे रोजी म्हणजे आज दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in यावर जावे लागेल. SSC चा निकाल पाहण्यासाठी सीट नंबर, रोल नंबर, आईचे नाव यावरून चेक करता येऊ शकते. परंतु तुम्हाला सोपा अन् सुलभ पद्धतीने निकाल पाहण्याची ट्रिक समजायला हवी.
वाचा सविस्तर बातमी