Join us
Daily Top 2Weekly Top 5

Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?

Virat Kohli: लखनौविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:03 IST

Open in App

आयपीएल २०२६ मध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेला आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली लखनौविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला. लखनौच्या युवा गोलंदाजाच्या एका अप्रतिम चेंडूने कोहलीला बोल्ड केले आणि संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरवली. विराट कोहलीला क्रिकेट विश्वात चेस मास्टर म्हणून ओळखले जाते. मात्र, या सामन्यात तो शून्यावर बाद झाल्यानंतर एक नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. २०१७ नंतर धावांचा पाठलाग करताना पहिल्यांदाच विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद होऊन पव्हेलियनमध्ये परतला.

लखनौने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीला दुसऱ्याच षटकात विराट कोहलीच्या रुपात मोठा धक्का बसला. लखनौचा गोलंदाज प्रिन्स यादवने टाकलेल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा अंदाज घेण्यात कोहली पूर्णपणे चुकला. १४०.४ किमी प्रति तास या वेगाने आलेल्या शार्प इनस्विंगर चेंडूने थेट कोहलीच्या ऑफ-स्टंप उडवला. विशेष म्हणजे, २०१६ च्या आयपीएल हंगामात धवल कुलकर्णीनंतर कोहलीला शून्यावर आउट करणारा प्रिन्स यादव हा आयपीएल इतिहासातील केवळ दुसराच गोलंदाज ठरला आहे. या हंगामात धावांचा पाऊस पाडणाऱ्या कोहलीसाठी हा सामना वैयक्तिकरीत्या निराशाजनक ठरला असला, तरी प्रिन्स यादवसारख्या युवा गोलंदाजाच्या कामगिरीने क्रिकेट वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लखनौची दमदार फलंदाजी

या सामन्यात लखनौने आरसीबीचा ९ धावांनी (DLS) पराभव केला. पावसामुळे झालेल्या व्यत्ययामुळे, लखनौ सुपर जायंट्सच्या डावादरम्यान खेळ अनेकदा थांबवावा लागला. रिणामी, हा सामना दोन्ही संघांसाठी प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला. लखनौने १९ षटकात आरसीबीसमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले. लखनौसाठी, मिचेल मार्शने १११ धावांची शानदार खेळी साकारली, तर निकोलस पूरनने ३८ धावांचे योगदान दिले आणि कर्णधार ऋषभ पंतने ३२ धावांची नाबाद खेळी केली. तर, आरसीबीकडून जोश हेझलवुड, कृणाल पंड्या आणि रसिक सलाम दार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली. 

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या नाकीनऊ

लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांची सलामीची जोडी अवघ्या ९ धावांवर तंबूत परतली. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी रचून आरसीबीला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, रजत पाटीदार आउट झाल्यानंतर आरसीबीच्या संघाने एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. टिम डेव्हिडने केवळ १७ चेंडूंमध्ये ४० धावांची वेगवान खेळी साकारून सामन्यात नक्कीच रंगत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरीस लखनौ सुपर जायंट्सने विजय मिळवला. लखनौकडून प्रिन्स यादवने तीन विकेट्स घेतले. तर शाहबाज अहमदने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kohli's Duck: Nine-Year Low as Lucknow Stuns RCB

Web Summary : Virat Kohli's rare duck against Lucknow, after nine years of chasing successfully, shocked RCB. Lucknow defeated RCB by 9 runs, powered by Marsh's century. Yadav's bowling spell sealed the victory.
टॅग्स :विराट कोहलीआयपीएल २०२६ऑफ द फिल्डरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलखनौ सुपर जायंट्स