Cheteshwar Pujara on Vaibhav Suryavanshi and new talents: क्रिकेटमध्ये अनेक नवे खेळाडू येत आहेत. वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे यांसारख्या अनेकांचे वय अतिशय कमी आहे. IPLसारखे व्यासपीठ मिळाल्याने या खेळाडूंना झटपट खेळायची संधी मिळते. पण युवा खेळाडूंना माझा असा सल्ला आहे की, त्यांनी सतत अपडेट राहायला हवे आणि टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहायला हवे. केवळ IPL खेळायचे अशा अनुषंगाने तयारी करणे फारसे उचित नाही. IPL गरजेचे आहेच, पण त्यासोबतच भारतीय संघालाही ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी त्यांनी खेळायला हवे. आगामी काळात वनडे विश्वचषक स्पर्धा येणार आहे, टी२० विश्वचषक स्पर्धाही सतत होत असते. या स्पर्धांमध्ये भारताला जिंकवणे हे त्यांनी आपले ध्येय ठेवायला हवे आणि त्यासोबतच आपापल्या IPL संघाकडूनही चांगली कामगिरी करत राहायली हवी, अशा शब्दांत चेतेश्वर पुजारा याने आपले स्पष्ट मत मांडले. पुजाराने 'लोकमत'शी विशेष संवाद साधला. त्यावेळी तो बोलत होता.
संघात सिनियर-ज्युनियर्सचा समतोल हवा!
"IPL मुळे कसोटी क्रिकेटचा दर्जा घसरत चालल्याच्या चर्चाही चुकीच्या आहेत. कारण IPL मुळे आपल्याला नवीन खेळाडू मिळतात. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज किंवा मोहम्मद शमीसारखे खेळाडू आपल्याला IPL मधूनच कसोटी क्रिकेटमध्ये आले आणि मोठे झाले. जर जगाशी स्पर्धा करायची असेल तर टी२० क्रिकेटही महत्त्वाचे आहे. कोणत्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीच्या जोरावर संघात स्थान द्यायला हवे. जर नवे खेळाडू चांगले खेळत असतील आणि अनुभवी खेळाडूंची कामगिरी खराब होत असेल. त्यात सुधारणा होत नसेल, तर नक्कीच पर्यायांचा विचार केला जायला हवा. पण जर वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू उत्तम कामगिरी करत असतील, तर अशा वेळी केवळ त्यांचे वय जास्त म्हणून त्यांना संघातून वगळणे योग्य नाही. अशा वेळी ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंचा संघात समतोल साधला जायला हवा," असे पुजारा म्हणाला.
समालोचनासाठी करावी लागली खास तयारी
मैदानावर कायम गप्प असणाऱ्या चेतेश्वर पुजाराने समालोक होण्यासाठी काय खास तयारी केली, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पुजारा म्हणाला, " मैदानावर खेळताना तुमच्याकडे कमी वेळ असतो. पण जेव्हा तुम्ही मैदानाबाहेर असता, तेव्हा तुम्ही मित्रांशी जशा गप्पा-गोष्टी करता, तसेच आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो. क्रिकेटबद्दल बोलणे माझ्यासाठी फारसे कठीण नाही, पण एखाद्या खेळाडूचा अभ्यास किंवा अनालिसिस करण्याचा मला अनुभव नव्हता. त्यासाठी मी थोडी मेहनत घेतली. आयपीएलमध्ये युवा, अनुभवी, भारतीय, परदेशी सगळे खेळाडू असतात. त्या सगळ्यांबाबत बोलण्यासाठी त्यांचा अभ्यास गरजेचा असतो. अशा वेळी मी त्या खेळाडूबाबत माहिती करून घेतो. त्याची पद्धत कशी? तो आधी कसा खेळलाय? सध्याची प्रगती काय? याचा मी अभ्यास करतो. त्यानंतर समालोचनाला सुरूवात करतो. तसे केल्याने आम्हाला अधिक रंजक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येते."
मुंबई इंडियन्सची खालावलेली कामगिरी फारसा चिंतेचा विषय नाही!
"मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब होतेय हे मान्य आहे, पण तो चिंतेचा विषय नाही. त्यांनी लखनौविरूद्ध दमदार विजय मिळवून कमबॅक केले आहे. मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंनी एकत्रित बसून रणनिती आखायची गरज आहे. कधीकधी खेळाडूंचा फॉर्म नसतो, पण ते जेव्हा फॉर्मात येतील तेव्हा त्यांना कुणीही रोखू शकणार नाही," असेही पुजाराने आवर्जून सांगितले.
Web Summary : Cheteshwar Pujara advises young cricketers to aim for Team India while playing IPL. He emphasizes balancing T20 skills with Test cricket aspirations. Senior-junior balance is crucial, favoring performance over age. He also shared his commentary preparation, focusing on player analysis.
Web Summary : चेतेश्वर पुजारा युवा क्रिकेटरों को IPL खेलते हुए टीम इंडिया के लिए लक्ष्य रखने की सलाह देते हैं। उन्होंने टी20 कौशल को टेस्ट क्रिकेट की आकांक्षाओं के साथ संतुलित करने पर जोर दिया। वरिष्ठ-कनिष्ठ संतुलन महत्वपूर्ण है, उम्र से अधिक प्रदर्शन को प्राथमिकता दी जानी चाहिए। उन्होंने खिलाड़ी विश्लेषण पर ध्यान केंद्रित करते हुए, अपनी कमेंट्री की तैयारी भी साझा की।