Microsoft सेवा विस्कळीत! काही विमान कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा बंद; पुण्यात विमान रद्द नाही, उड्डाणे उशीरा
By नितीश गोवंडे | Updated: July 19, 2024 16:36 IST2024-07-19T16:35:01+5:302024-07-19T16:36:08+5:30
अचानक निर्माण झालेल्या समस्येनंतरही पुणे विमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाही, उड्डाणे उशिरा सुरु

Microsoft सेवा विस्कळीत! काही विमान कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा बंद; पुण्यात विमान रद्द नाही, उड्डाणे उशीरा
पुणे : जगभरातील कॉम्प्युटर आणि लॅपटॉप ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) शुक्रवारी बळी पडल्या. मायक्रोसॉफ्ट विंडोज वर चालणारे अनेक कॉम्प्युटर आणि लॅपटॉप अचानक क्रॅश झाले. याचा परिणाम काही विमान कंपन्यांवर देखील झाला. कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा बंद झाल्या, मात्र अचानक निर्माण झालेल्या समस्येनंतरही पुणेविमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाही. काही विमानांची उड्डाणे मात्र १० ते ४० मिनिटे उशीराने होत होती.
मायक्रोसॉफ्टच्या वतीने अझुरे क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ या सेवांमध्ये समस्या आल्या आहेत, असे सांगण्यात आले. तसेच, कंपनीच्यावतीने आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचे निराकरण करण्यासाठी अनेक टीम्सना समाविष्ट केले आहे. या मागचे कारण देखील आम्ही निश्चित केले आहे, असे सांगण्यात आले. तसेच या समस्येचे स्वत:हून निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक सूचना येण्याची वाट पाहा. आम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे आणि लवकरच तुम्हाला अपडेट मिळेल असे देखील सांगण्यात आले. आयटी कंपन्यांसह देशातील मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, अॅमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवर त्याचा परिणाम झाला.
शहरातील विमान उड्डाणे उशीराने..
पुणे शहरातून दिवसा विमानांची ये-जा कमी असते. अचानक मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झाल्याने इंडिगो, स्पाईसजेट, अकासा आणि विस्तारा या विमान कंपन्यांचे ऑनलाईन बुकिंग आणि वेब चेक इन बंद झाले. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर जाऊनच चेक इन करावे लागले. यासाठी संबंधित विमान कंपन्यांकडून अधिकचे मनुष्यबळ देखील पुरवण्यात आले होते. दिल्ली, मुंबई, गोवा यासह दुबई व अन्य देशातील विमान सेवेवर याचा मोठा परिणाम झाला असला तरी पुण्यातून मात्र एकही विमान रद्द करण्यात आले नव्हते. तरी संबंधित विमान कंपन्यांकडून देखील आमच्या सिस्टीम प्रभावित झाल्या असून, समस्येचे निराकरण झाल्यावर तुम्हाला कळवू, आम्ही तुमच्या संयमाची प्रशंसा करतो असे सोशल मीडियाद्वारे सांगण्यात आले.
या विमानांची उड्डाणे उशीराने..
अ.क्र. कुठून-कुठे - विमान कंपनी उड्डाणांची नियोजित वेळ उशीराने केलेले उड्डाण
१) पुणे ते हैदराबाद इंडिगो १२:३५ ०१:२५
२) पुणे ते रायपूर इंडिगो १२:५५ ०१:४४
३) पुणे ते दिल्ली - विस्तारा - ११:१५ ११:२९
४) पुणे ते हैदराबाद - इंडिगो - ११:०५ ११:२९
५) पुणे ते गोवा - स्पाईसजेट १२:३० ०४:२०
६) पुणे ते जोधपूर - इंडिगो ११:४५ १२:२८
७) पुणे ते कलकत्ता - आकासा ०१:०५ ०२:१८
८) पुणे ते बडोदा - इंडिगो ०१:४५ ०२:२६
९) पुणे ते गोवा - इंडिगो १२:२५ ०४:३०
यासह अन्य विमाने देखील तांत्रिक कारणास्तव उशीराने उड्डाण घेत होती.
पुणे विमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाही
आजच्या डिजीटल युगात कधीतरी अशी घटना घडते, त्यापैकी ही घटना आहे. समस्या निर्माण होताच जगभरातील सगळ्याच नामांकित एजन्सी यामध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. मायक्रोसॉफ्टच्या ग्राहकांसह विमानाद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल असे नियोजन करण्यात आले, ही प्रशंसनीय बाब आहे. पुणे विमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाही हे देखील कौतुकास्पद आहे. विमानतळावर अशा घटनेची शक्यता गृहीत धरून नेहमी एक पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रवाशांना कमीत कमी असुविधा होईल. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ