Hyderabad: मुलांसोबत तलावाजवळ गेली अन्...; आईचं भयानक कृत्य, नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:32 IST2026-01-03T19:31:26+5:302026-01-03T19:32:18+5:30
Hyderabad News: हैदराबाद येथील हुसेन सागर तलाव परिसरात धक्कादायक घटना घडली.

Hyderabad: मुलांसोबत तलावाजवळ गेली अन्...; आईचं भयानक कृत्य, नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
हैदराबाद येथील एका २९ वर्षीय मातेने आपल्या दोन्ही लहान मुलांसमोरच हुसेन सागर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली. या थरारक कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून महिलेने टोकाचे पाऊल का उचलले? याचाही पोलीस तपास करीत आहेत.
पहाडी शरीफ परिसरातील रहिवासी असलेली वसंता (वय, २९) ही शुक्रवारी संध्याकाळी आपल्या दोन चिमुरड्यांना घेऊन हुसेन सागर येथील टँक बंड परिसरात गेली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वसंताने आधी आपल्या सात वर्षांच्या आणि साडेतीन वर्षांच्या मुलांना जवळ बोलावले. त्यांच्या हातात स्वतःचा मोबाईल फोन दिला आणि त्यांना तिथेच फोनवर गेम खेळण्यास सांगितले. मुले फोनमध्ये दंग होताच, वसंताने क्षणाचाही विलंब न लावता तलावात उडी घेतली.
वसंताला पाण्यात उडी मारताना पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला आणि तात्काळ पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तलावातून वसंताचा मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी वसंताचे दोन्ही तिथेच होते. घटनेनंतर पोलिसांनी मुलांच्या हातात असलेल्या मोबाईलवरून कुटुंबीयांचा क्रमांक शोधला आणि त्यांना या घटनेची माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंताच्या पतीचे, लक्ष्मण यांचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर वसंता आपल्या आई आणि भावासोबत राहत होती. रोजंदारीवर काम करून ती आपल्या दोन मुलांचे पालनपोषण करत होती. मोठा मुलगा दुसरीत शिकतो, तर लहान मुलगा अवघ्या साडेतीन वर्षांचा आहे. आईच्या निधनानंतर आता या दोन लहान मुलांचे काय होणार? या विचाराने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.